- सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून लवकरच सुरू होणाऱ्या नियोजित तथागत नागरिक सहकारी पतपेढीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी लांजा येथील माता रमाई नागरी पतसंस्थेला भेट देऊन फक्त संस्थेच्या विविध योजनांची माहिती करून घेतली.
या अभ्यास दौऱ्यात सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी तथा पतसंस्थेचे मुख्य प्रवर्तक अरविंद वळंजू, सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत कदम यांच्यासह विजय कदम, रमेश कदम, मोहन जाधव, सुहास कदम, सुनील कदम आदी सहभागी झाले होते.
प्रारंभी लांजा येथील माता रमाई पतसंस्थेचे अध्यक्ष बी. आर कांबळे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करून उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचय स्पष्ट केला. त्यानंतर पतसंस्था स्थापन करण्याचा उद्देश, आलेल्या विविध अडचणी, त्यावर मात कशा पद्धतीने केलली आणि नोंदणीचा पहिला टप्पा कसा प्राप्त केला?, हे सांगून त्यानंतर प्रत्यक्षात पतसंस्थेचे काम सुरू केल्यानंतर येणाऱ्या विविध अडचणी सांगून आपण सुरू केलेल्या विविध आधुनिक योजना कायम ठेव, खेळते भांडवल, कर्ज वितरण, आर डी अशा सुविधा निर्माण करून विविध विषयाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच संचालक मंडळ व व्यवस्थापक हे कसे पूरक असायला पाहिजेत आणि त्यांचा काम करण्याची पद्धत कशी असावी?, याबाबत मार्गदर्शन केले. शिवाय आपल्या नियोजित तथागत संस्थेला आवश्यक ते सहकार्य यापुढेही करण्याची ग्वाही दिली यावेळी माता रमाई पतसंस्थेचे मानद सचिव सी .बी सकपाळ, संचालक प्रदीप पवार, व्यवस्थापक नितीन कांबळे, क्लार्क तृप्ती कांबळे आदी यावेळी उपस्थित होते. शेवटी मोहन जाधव यांनी रमाई पतसंस्थेच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.