Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

खळबळजनक – वेंगुर्ले शिक्षक पतपेढीत अपहार करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार.! – अध्यक्ष नारायण नाईक.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्त प्राथमिक शिक्षकांची जीवनदायीनी असलेली व सर्व प्राथमिक शिक्षकांना आर्थिक स्थैर्य निर्माण करून देणारी, शिक्षकांसाठी कामधेनु, कल्पतरू समान असणारी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी आहे. या पतपेढीच्या माध्यमातून शिक्षकांनी आपले संसार फुलविले आहेत प्रत्येक सुखदुःखात ही पतपेढी हक्काची संस्था म्हणून उभी राहिलेली आहे. राज्यभरात प्राथमिक शिक्षकांच्या जेवढ्या म्हणून पतपेढी अगर बँक आहेत त्यामध्ये सभासदांना सर्वाधिक सुविधा व कमी व्याजदरात मुबलक कर्ज उपलब्ध करून देणारी राज्यातील ही एकमेव पतपेढी आहे. पतपेढीने आपल्या कामाचा आलेख, नफ्याचे प्रमाणही दरवर्षी उंचावलेले आहे.
परंतु दुर्दैवाने एका कर्मचाऱ्याने केलेल्या आर्थिक अनियमिततेमुळे आमच्या पतपेढीला नाहक बदनामीला सामोरे जात जावे लागत आहे. ही क्लेशदायक व मनाला यातना देणारी घटना आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या वेंगुर्ला शाखेत आर्थिक अनियमितता आढळून आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून ही अनियमितता कागदोपत्री न करता सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. संबंधिताने सुमारे ४१ लाखांचा अपहार केला असून हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान संशयिताकडून ४५ लाख वसूल करण्यात आले आहेत. संस्थेच्या सीए मार्फत ऑडिट सुरू असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. तसेच संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती पतपेढीचे अध्यक्ष नारायण नाईक यांनी दिली. ते आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष संतोष राणे, संचालक संजय पवार, चंद्रसेन पाताडे, विद्याधर तांबे, सचिन बेर्डे, विजय सावंत, श्रीकृष्ण कांबळी, मंगेश कांबळी, ऋतुजा जंगले, सिताराम लांबर आदी उपस्थित होते.

मे 2023 मध्ये पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक होऊन आमच्या भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलने पतपेढीवर पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण केले. आमच्या संचालक मंडळाने पतपेढीच्या कामकाजात रुजू झाल्यानंतर गेल्या वर्षभरात अनेक क्रांतिकारी व सभासदाभिमुख निर्णय घेतले आहेत. यावर्षी संस्थेचा वार्षिक नफा विक्रमी झालेला आहे. संस्थेमार्फत दरवर्षी संस्थेच्या सर्व शाखांची तपासणी करण्याच्या दृष्टीने शाखा सिद्धी हा उपक्रम राबविण्यात येतो. गेल्या वर्षी नवीन संचालक मंडळ व काही दिवसातच वार्षिक अधीमंडळ सभा असल्याने हा उपक्रम राबविण्यात आला नव्हता. यावर्षी माहे जून मध्ये शाखा सिद्धी उपक्रम राबविण्यात आला. वेंगुर्ला शाखेत शाखा सिद्धी टीमने भेट दिली असता तेथील रेकॉर्ड तपासताना शाखाधिकारी यांच्या कामकाजा संदर्भात काही त्रुटी व संशयास्पद बाबी आढळल्या. त्याचा उहापोह शाखा सिद्धी कमिटी बैठकीमध्ये करण्यात आला व कमिटीचा निर्णय राखून ठेवून प्रथमतः शाखेची अंतर्गत तपासणी करण्यात यावी, असा आदेश देण्यात आला. प्रधान कार्यालयातील अधिकारी यांनी या आदेशानुसार वेंगुर्ला शाखेची अंतर्गत तपासणी केली. त्यामध्ये त्यांना काही सभासदांची थकबाकी आढळून येत आहे, असा रिपोर्ट दिला.

गेले वर्षभर वेंगुर्ला शाखेकडून कोणतीही थकबाकी नसल्याचे कळविण्यात आले होते मग आत्ताच अशी थकबाकी कशी काय आढळली? असा प्रश्न निर्माण झाल्याने संचालक मंडळाने वेंगुर्ला शाखेतील थकबाकी व इतर व्यवहार काटेकोर तपासावे असे आदेश अधिकारी यांना दिले. प्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पुन्हा तपासणीला जात शाखेची सखोल तपासणी केली असता त्यांना तत्कालीन शाखाधिकारी यांनी काही सभासदांच्या कर्ज व ठेव खात्याच्या रकमा संगणक प्रणाली मधून आपल्या अन्य काही सभासदांच्या खात्यावर वळविल्या असल्याचे आढळून आले. सदर बाब त्यांनी अध्यक्ष यांचे निदर्शनास आणली. यावर अध्यक्ष यांनी शाखा सिद्धी कमिटी सोबत घेऊन वेंगुर्ला शाखेला तात्काळ भेट दिली. सदर भेटीत संचालक यांनी पुन्हा एकदा शाखेची सखोल तपासणी केली. त्यामध्ये संबंधीत शाखाधिकारी याने आर्थिक व्यवहारात अनियमितता केल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. आपल्या अनियमिततेचा आकडा वाढत असल्याचे लक्षात येताच, संबंधित शाखाधिकारी याचे कालावधीतील सर्व रेकॉर्ड व डेटा पंच यादी करून प्रधान कार्यालयात आणण्यात आले. तदनंतर नजीकच्या संचालक मंडळ सभेत या अनियमिततेची चर्चा करण्यात येऊन सदर अनियमितता तपासण्यासाठी संस्थेतील अधिकारी यांची तपासणी समिती नियुक्त करण्यात आली. सदर तपासणी समितीने दिनांक 29 जुलैपासून तपासणी सुरू केली. पहिल्याच दिवशी तपासणीत अनियमितता आढळत असल्याचे कळविण्यात आल्यावर संबंधित शाखाधिकारी यास प्रथम नोटीस बजावण्यात आली. नोटीस बजावताच संबंधित शाखाधिकारी यांनी अनियमितता रक्कम भरण्यासाठी स्वतःहून काही रक्कम संस्थेच्या खाती जमा केली.

सहकारी संस्थांना अपहार नियमानुसार संस्थेची अगर सभासदांची झालेली आर्थिक नुकसानी भरून घेणे क्रमप्राप्त असते. त्यानुसार संबंधित कर्मचारी यांनी अशी रक्कम संस्थेमध्ये जमा केली आहे. संस्थेने नेमलेल्या सनदी लेखापालाने तपासणी करून अधिकृतपणे अशा अफरातफर बाबत लेखी अहवाल दिल्या खेरीज संस्थेला पुढील कारवाई करता येत नव्हती. दिनांक 9 ऑगस्ट रोजी संस्थेचे सनदी लेखापाल यांनी प्राथमिक अहवाल दिल्यानंतर संचालक मंडळाने आवश्यक ती कारवाई प्रक्रिया सुरू केलेली आहे. तसेच वेंगुर्ला तालुका शाखेतील कोणत्याही सभासदाची एक रुपयाही रक्कमेची नुकसानी होणार नाही, याची खबरदारी संचालक मंडळाने घेतलेली आहे. सर्व सभासदांची कर्ज व ठेव खाती नियमित करण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाने पावले उचललेली आहेत.कोणत्याही सभासदांची तक्रार नसतानाही संचालक मंडळाने हा प्रकार शोधून काढून उघड केला आहे.त्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही.तसेच या अनियमिततेतून संस्थेची आर्थिक नुकसानी झालेली नसली तरी सभासदांची आर्थिक नुकसानी झालेली आहे.ती भरून देण्यास संचालक मंडळ कटिबध्द आहे.त्यामुळे कोणीही सभासदांनी विचलित न होता संचालक मंडळावर विश्वास ठेवावा. तसेच या संपूर्ण प्रकरणी संचालक मंडळ सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर उपनिबंधक सिंधुदुर्ग यांना सविस्तर अहवाल देणार आहे.संस्थेची बदनामी करून संस्थेविषयी नाहक गैरसमज करण्यात काही मंडळी गुंतली असून ही बाब खेदजनक व दुर्दैवी आहे.अशा लोकांच्या भूलथापांना सभासद बळी पडणार नाहीत,याची आम्हाला खात्री आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles