- सावंतवाडी : आज घडीला शहर विकासाचे व स्वच्छतेचे प्रशासनाने तीन तेरा वाजवले आहेत. सावंतवाडी नगरपरिषदेच्या इतिहासातील भ्रष्ट कारभार चालला आहे, याचा जाब विचारणार, असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनीदिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
सावंतवाडी शहर नगरपरिषद एक सुंदर स्वच्छ कारभाराची नगरपरिषद म्हणून ओळख होती. आज या नगरपरिषदेचा कारभार नवीन अधिकाऱ्यांच्या हातात गेला आहे. नगरपरिषद हे भ्रष्टाचाराचे कुरण आहे आणि ते खाल्लंच पाहिजे, अशा अविर्भावामध्ये नगरपरिषदेचा अंधाधुंद कारभार सुरू आहे. दोन महिन्यापूर्वी घाई गडबडीने केलेली रस्ते सगळेच्या सगळे उकडून गेले आहेत. येथे अनेक अपघात झाले आहेत. अपघातामध्ये अनेक लोक जखमी झाले. शहरातील सर्व पानंदी निसरड्या झाल्या असून अनेक लोकं घसरून पडतात. कुणाचंही याकडे लक्ष नाही. सार्वजनिक शौचालयाची अवस्था भयानक आहे. चौकाचौकात रस्त्या रस्त्यावरती कचरा साचलेला आहे. सर्वत्र डासांचा फैलाव झालेला आहे.
सावंतवाडी मच्छी मार्केट अत्यंत अस्वच्छ असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सार्वजनिक स्ट्रीट लाईट बऱ्याच ठिकाणी बंद असतात. गार्डन, स्मशानभूमी अस्वच्छता तसेच भ्रष्ट कारभाराचा जाब विचारण्यासाठी मुख्याधिकारी यांच्याकडे मंगळवारची वेळ मागितली आहे, मंगळवारी नगरपरिषदेला प्रत्यक्ष भेट देऊन जाब विचारणार असल्याचेही माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कळविले आहे.