सावंतवाडी : शिक्षण, साहित्य, आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांना बालिका दिनाच्या औचित्याने सिंधुदुर्ग शिक्षक भारतीच्यावतीने ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचाच नव्हे, तर नारीशक्तीच्या असीम सामर्थ्याचा आणि तिच्या सतत प्रेरणा देणाऱ्या कार्याचा गौरव आहे.
🛑 पुरस्कार निवडीची वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रिया :
शिक्षक भारती सिंधुदुर्ग हा पुरस्कार कोणत्याही अर्ज, बायोडेटा किंवा माहिती मागवून देत नाही. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचे कार्य अभ्यासून शिक्षक भारतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वतःहून या महिलांचा शोध घेतात. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि साहित्यिक योगदानाची दखल घेऊन निवड केली जाते. हा दृष्टिकोन केवळ पुरस्कार निवड प्रक्रियेचे पारदर्शक स्वरूप अधोरेखित करत नाही, तर समाजातील कर्तृत्वाला ओळख देण्याचा एक अभूतपूर्व उपक्रम ठरतो.
🛑 पुरस्कार वितरणाची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत:
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी शिक्षक भारती सिंधुदुर्ग ह्या पुरस्काराचे वितरण अत्यंत साधेपणाने, पण भारदस्त पद्धतीने केले जाते. मानपत्र, शाल, श्रीफळ, आणि चंदनाचे रोप ही पुरस्काराची विशेष स्वरूपे आहेत. चंदनाचे रोप म्हणजेच शिक्षण, सृजनशीलता, आणि प्रेरणेचे प्रतिक, जे पुढील पिढ्यांसाठी नवनिर्मितीचा वसा जपते.
🛑 शिक्षक भारतीचे योगदान:
शिक्षक भारती सिंधुदुर्ग हा केवळ शिक्षकांचा संघटन नाही, तर हा शिक्षण, सामाजिक परिवर्तन, आणि नारीशक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या चळवळीचा अविभाज्य भाग आहे. शिक्षणक्षेत्रातील अडचणी सोडवण्याबरोबरच समाजातील उपेक्षित क्षेत्रांमध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहित करणे, हा शिक्षक भारतीचा मूळ उद्देश आहे.
🛑 प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांचे गौरवशाली कार्य :
प्रा.डॉ. शरयू आसोलकर या गेली 33 वर्षे संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे मराठी विषयाचे अध्यापन करत असून मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. प्रभावी अध्यापनातून महाविद्यालयीन युवकांच्या जाणिवा समृद्ध करताना स्वतःच्याही उत्कट भावना त्यांनी शब्दबद्ध करत साहित्य निर्मिती केली आहे. “तुटलेपण पुन्हा बांधून घेताना” हा कवितासंग्रह, ‘ओळ अनमोल’ हे संपादन, विविध नियतकालिकांमधून केलेले समीक्षा लेखन, ललितलेखन, पुस्तक परीक्षणे या माध्यमातून साहित्य चळवळीमध्ये त्यांचा क्रियाशील सहभाग राहिला आहे. प्राध्यापिका म्हणून महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तसेच मुंबई विद्यापीठाच्या विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडतानाच मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, सिंधुदुर्ग साहित्य संघ, नवाक्षर दर्शन नियतकालिकाचे संपादक मंडळ अशा साहित्य विश्वामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या संस्थांच्या त्या क्रियाशील सदस्य आहेत. मातृभाषा मराठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी आयोजित अनेक चर्चासत्रे, आकाशवाणी कार्यक्रम, काव्य मैफिली यामध्ये त्यांचा सातत्याने अभ्यासपूर्ण सहभाग राहिला आहे. त्यांच्या कवितांचा समावेश अभ्यासक्रमात करून मुंबई विद्यापीठाने त्यांचे साहित्यमूल्य अधोरेखित केले आहे.
🛑 मान्यवरांचे विचार :
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी डॉ. आसोलकर यांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले, “डॉ. शरयू यांच्या कवितांमध्ये संवेदनशीलता, प्रगल्भ विचार, आणि समाजभानाची अनोखी गुंफण आहे. त्या केवळ एक शिक्षिका नसून विद्यार्थ्यांना विचारप्रवण करणाऱ्या दीपस्तंभ आहेत.”
शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह श्री. संजय वेतुरेकर यांनी सांगितले, “शिक्षणाचा खरा अर्थ विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या विचारांची पेरणी करणे आहे, आणि डॉ. शरयू आसोलकर यांनी हे कार्य अत्यंत निष्ठेने केले आहे. त्या मराठी भाषेच्या उत्थानासाठी सातत्याने कार्यरत आहेत.”
शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर यांनी डॉ. शरयू आसोलकर यांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले, “डॉ. शरयू आसोलकर या आपल्या जिल्ह्यातील खऱ्या अर्थाने रत्न आहेत. त्या साहित्य क्षेत्रातील तेजस्वी मोती असून त्यांच्या प्रतिभेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला अभिमान वाटतो. डॉ. आसोलकर यांच्या सन्मानाचा मान आम्हाला मिळतो आहे, ही शिक्षक भारतीसाठी अनमोल गोष्ट आहे. आज समाजात अनेक ठिकाणी मतभेद, संघर्ष, आणि धर्माचे ध्रुवीकरण दिसते, अशा अस्थिरतेच्या काळात, डॉ. आसोलकर मॅडम शांत, सुगंधी आणि शीतल व्यक्तिमत्त्वाने समाजाला प्रेरणा देत आहेत.
डॉ. आसोलाकर यांना आम्ही चंदनाचे रोप भेट दिले, ते केवळ सन्मानाचे प्रतीक नसून त्यांच्या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत की त्या चंदनासारखेच स्वतःच्या मुळाशी घट्ट राहून आपल्या विचारांचा सुगंध समाजात सर्वदूर पसरवतील. डॉ. आसोलकर यांच्या कार्यातून समाजाला शांती, सौहार्द आणि प्रगतीचा संदेश मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. शिक्षक भारतीसाठी हा क्षण प्रेरणादायी आणि गौरवास्पद आहे.”
महिला आघाडी प्रमुख सौ. सुस्मिता चव्हाण यांनी आपल्या मनोगतात म्हटले, “डॉ. शरयू आसोलकर यांच्या कार्याची उपमा अभूतपूर्व प्रेरणेला देता येईल. त्यांची कवितांमधील संवेदनशीलता आणि प्रगल्भ विचार समाजाच्या उन्नतीसाठी महत्त्वाचे आहेत. त्या एक शिक्षिका नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये आशेचा दिवा प्रज्वलित करणाऱ्या मार्गदर्शिका आहेत.”
“शिक्षक भारतीचा हा उपक्रम केवळ पुरस्कार वितरणाचा क्षण नाही, तर शिक्षण, साहित्य आणि संस्कृतीला दिशा देणारी एक प्रेरणादायी चळवळ आहे. आज आपल्याला डॉ. आसोलकर यांच्यासारख्या व्यक्तींची गरज आहे, ज्या समाजात सौहार्द, प्रगती आणि ज्ञानाचा संदेश पसरवतात,” असे त्यांनी नमूद केले.
🛑 या उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य :
या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह श्री. संजय वेतुरेकर, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांत आडेलकर, सचिव श्री. समीर परब, राज्य प्रतिनिधी श्री.चंद्रकांत चव्हाण, कार्याध्यक्ष श्री. प्रदीप सावंत, महिला आघाडी प्रमुख सौ. सुस्मिता चव्हाण, श्री.दीपक तारी, श्री.अनिकेत वेतुरेकर, श्री.माणिक पवार, सौ.शारदा गावडे, सौ. सुमेधा नाईक, श्री. सिद्धार्थ तांबे, श्री. संतोष वैज, श्री. मोहन पालेकर, श्री. अरविंद मेस्त्री, श्री. रमेश गावडे , श्री.परमेश्वर सावळे , श्री. प्रदीप देसाई, श्री. टिळवे सर, श्री. अभिषेक कशेळीकर, श्री. पवन वणवे, श्री. दशरथ सांगळे, श्री. कदम सर, श्री. विद्यानंद पिळणकर, श्री.गोपाळ गवस , श्री. भिवा धुरी, श्री. राजाराम पवार, सौ. दीप वारंग, सौ. रूपा कामत, श्री. सिद्दीकी मुलानी , श्री. विजय ठाकर, श्री.देऊ साईल, श्री.दत्ताराम नाईक, श्री.सुशांत नाईक, श्री.आनंद कदम, श्री. दिलीप गाडेकर, श्री. महेश पास्ते, श्री. विठोबा कडव, श्री. नितिन माने, कुमारी अनन्या वेतुरेकर, कुमारी तीर्था आडेलकर यांची विशेष उपस्थिती होती. ह्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ. सुस्मिता चव्हाण यांनी केले
🛑 या पुरस्काराने डॉ. आसोलकर यांच्या कर्तृत्वाचा सन्मान तर झाला आहेच, पण शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकासाठी तो प्रेरणा ठरला आहे. शिक्षक भारतीच्या या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर प्रशंसा होत आहे.