पाटणा : मुंगूस पाहायला मिळणे हा शुभ शकून मानला जातो, त्यामुळेच मुंगूसाचं दर्शन झाल्यानंतर अनेकजण मोठ्या आनंदाने ही वार्ता देत असतात. तर, कुठं मुंगूस आणि नागाची झुंज दिसून आल्यानंतरही विलक्षण क्षण पाहिल्याचा आनंद होतो. मात्र, आता चक्क विमानतळावरील धावपट्टीवरच मुंगूस अन् नागाची झुंज पाहायला मिळाली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. बिहारमधील लोकनायक जयप्रकाश नारायण पटना विमानतळावर हे दुर्लभ चित्र आज दिसून आलं. विशेष म्हणजे विमानतळावरील या व्हिडिओत तीन मुंगूस आणि एका नागाची लढाई दिसून येते.
मुंगूस आणि नागाचं जन्मोजन्मीचं वैर असतं, ही सर्वसाधारण धारणा आहे. अनेक हिंदी चित्रपटातूनही मुंगूस आणि नागाची लढाई, त्यांच्यातील वैर दर्शवण्यात आलं आहे. दोघांची नजरानजर झाल्यास सामना होतोच, एकमेकांसमोर ते आले की लढाई सुरू होतेच. पाटणा विमानतळावरील धावपट्टीवरही एक नाग फणा काढून उभा असल्याचं दिसून येतं. तर, या नागावर तीन मुंगूस झडप घालतात, नागाला लक्ष्य करुन तीन मुंगूस त्याच्यावर तुटून पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, तितक्याच तीव्रतेने नागही प्रतिकार करत असल्याचे दिसून येते. 37 सेकंदाच्या या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून घटनेनं आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, या व्हिडिओवर नेटीझन्स कमेंट करुन आपलं मत मांडत आहेत. तर, हा व्हिडिओ 3-4 दिवसांपूर्वीचा असल्याचंही काहींनी म्हटलं आहे.