Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती.! ; नाराजी नाट्यामुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय.

मुंबई : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला आता स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून ( शिंदे गट) विरोध झाला. तर नाशिकमध्येही दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यामुळे सध्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून घेण्यात आला आहे.

रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. अदिती तटकरे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर भरत गोगावलेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. महाड विधानसभा संघातील सर्वच पदाधिकाऱ्यांकडून सामूहिक राजीनामे देण्यात आले. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळत शिवसैनिकांनी निदर्शनं केली.

तसेच नाशिकमध्येही पालकमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. दादा भुसे यांना डावलून गिरीश महजान यांना नाशिकचं पालकमंत्रीपद दिल्याने कार्यकर्ते नाराज आहेत.

आदिती तटकरेंच्या नियुक्तीमुळे भरत गोगावले नाराज –

राज्यातील आमदारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पालक मंत्री पदाचे वाटप नुकतेच पूर्ण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं. महायुतीमधील इतर काही नेत्यांकडेही पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली, तर काही नेत्यांना डावलण्यात आलं आणि त्यावरूनच सुरू झाल नवं नाट्य.

रायगडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांना मिळालं, मात्र त्यामुळे नवा संघर्ष निर्माण झाला आहे. भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री पद न मिळाल्याने ते प्रचंड नाराज झाले आहेत. गोगावले यांच्या नाराज झालेल्या शिवसैनिक कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळून रात्री मोठा हंगामा केला. या संदर्भात पोलिसांना हस्तक्षेप करुन महामार्गाची वाहतूक कोंडी दूर केली आहे. या संदर्भात आता भरत गोगावले यांचे कार्यकर्ते आता प्रचंड आक्रमक झाले असून गोगावले यांचे मंत्री झाल्यानंतर एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मिळालेले पदही काढून घेतल्याने ते प्रचंड नाराज आहेत.

भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळालं नाही तरी तो डगमगणार नाही.कोणीही भडकावून भाषण करू नका. भरतशेठला फसवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. श्रद्धा आणि सबुरी ठेवा,ईश्वर के घर देर हे अंधेर नहीं असे भरत गोगावले यांनी म्हटले होते. हा निर्णय मनाला पटण्यासारखा नाही, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी व्यक्त केली होती.

गिरीश महाजनांच्या नियुक्तीलाही स्थगिती –

भरत गोगावले यांच्याप्रमाणेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पालकमंत्रीपद मिळाले नाही. दादा भुसे यांना पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्रीपद हवे होते. पण नावं जाहीर झाल्यानंतर नाशिकचे पालकमंत्रीपद हे जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले. त्यामुळे दादा भुसेही नाराज झालेत. त्यामुळे आता रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांतील महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles