कणकवली : फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग, कणकवलीच्या इंटेरियर आणि फॅशन डिझाईन विभागातर्फे ‘आरंभ एक्सिबिशन-2025’ चे भव्य आयोजन 25 व 26 जानेवारी रोजी करण्यात आले. सिंधुदुर्गात प्रथमच असे अनोखे प्रदर्शन भरवण्यात आले असून, या संकल्पनेने कणकवलीकरांची मने जिंकली. प्रदर्शनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून संदीप नलावडे (अध्यक्ष, कंज्युमर सोसायटी), सिनेअभिनेता निलेश पवार आणि प्रवीण नाईक उपस्थित होते.
या प्रदर्शनाची मध्यवर्ती थीम “Coastal Chic” होती, जी समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्याने प्रेरित होती. इंटेरियर डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण बुटीक स्वतः डिझाइन करून तयार केले. त्यांनी स्वतः बनवलेल्या नाविन्यपूर्ण फर्निचरचा वापर केला, जो संपूर्णपणे पर्यावरणपूरक आणि अपसायकलिंग संकल्पनेवर आधारित होता. बांबू, हेम्प, शंख, समुद्रकिनाऱ्यावरील खडे आणि वाळू यांसारख्या नैसर्गिक घटकांचा उपयोग करून त्यांनी बुटीकला एक अनोखी किनारी सौंदर्याची झलक दिली.
फॅशन डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी खास बुटीकसाठी समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यावर आधारित गारमेंट्स तयार केली. निळा, करडा, वाळूसारखा रंग, ऑफ-व्हाइट आणि हलका हिरवा अशा रंगछटांमध्ये त्यांनी बीच थीम आधारित कपडे साकारले. 65 हून अधिक गारमेंट्स विद्यार्थ्यांनी स्वतः डिझाइन आणि तयार केले. यामध्ये चिल्ड्रन्स वेअर (फर्स्ट इयर), वुमन्स वेअर (सेकंड व थर्ड इयर) आणि मेंस वेअर (थर्ड इयर) चा समावेश होता. मुलांचे कपडे डिझाईन करताना तीन वेगवेगळ्या वयोगटांचा विचार केला गेला. सर्व कपडे XS ते XXL या मापांमध्ये डिझाईन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी फॅब्रिक सोर्सिंगपासून ते एम्ब्रॉयडरी, बीड वर्क आणि शिवणकाम सर्व काही स्वतः केले. या कलेक्शनचे प्रोफेशनल फोटोशूट आचरा, देवगड आणि मालवण येथे पार पडले, व त्याचा कॅटलॉगही प्रदर्शनात मांडण्यात आला.
इंटेरियर आणि फॅशन डिझाईनचा असा अनोखा संगम कधीच पाहायला मिळाला नव्हता. विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे बनवलेल्या बुटीकमध्ये सादर केलेली गारमेंट्स आणि इंटेरियरची संकल्पना यामुळे हे प्रदर्शन संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले.
या प्रदर्शनाला 500 हून अधिक लोकांनी भेट दिली. इंटेरियर आणि फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, डॉक्टर्स, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांचे पालक यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शैलेश कदम, साक्षी खोपटकर, आर्या बिडये, मिसबा, मृणालीं सातारकर, मृणालीं गावडे आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या मेहनतीमुळेच हे प्रदर्शन भव्य स्वरूपात यशस्वी झाले.
या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना सर्जनशीलता आणि शाश्वतता यांचा उत्तम संगम साधण्याची संधी मिळाली. ‘आरंभ-2025’ हे प्रदर्शन सिंधुदुर्गात इंटेरियर आणि फॅशन डिझाईन क्षेत्रातील नवे पर्व सुरू करणारे ठरले आहे. यशस्वी आयोजनाबद्दल कॉलेज स्टाफ आणि विद्यार्थ्यांचे फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या संचालिका सार्था कदम यांनी अभिनंदन केले.