वाचक मित्रहो,
मागच्या महिन्यामध्ये लोकमत वृतसमूहाच्या कोल्हापूर आवृतीच्या संपादकाने शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील एका प्राचार्यांची मुलाखत घेतली . त्या मुलाखतीचा Video खूपच व्हायरल झाला तसेच त्यानुषंगाने वर्तमान पत्रात छापलेली बातमी देखील उच्चशिक्षण क्षेत्रात खूपच चर्चिली गेली व आजही जात आहे.
या मुलाखतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील महाविद्यालयीन शिक्षणाची अब्रू चव्हाट्यावर मांडली गेली. ही मुलाखत जरी शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रासंबंधी असली तरी संपूर्ण महाराष्ट्रात यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही.
आर्टस , कॉमर्सला तशीही मुले फारशी हजर रहात नव्हतीच परंतु कोरोनाने हे चित्र अधिकच भयानक बनविले आहे. कोरोनोत्तर काळामध्ये विद्यार्थी महाविद्यालयात यायला तयार नाहीत . आणि हे विद्यार्थी येत नाहीत याबद्दल प्राध्यापकांना काहीही खंत वाटत नाही. “तुम्ही विद्यार्थी आणून द्या आम्ही तास घ्यायला तयार आहोत “असे प्राचार्यांना सुनावणारे प्राध्यापक आहेत . आपल्या तासाला विद्यार्थी येत नाहीत म्हणजे आपले अध्यापन प्रभावी होत नाही किंवा विद्यार्थांना आकर्षित करीत नाही . याबद्दल कोणालाही खंत वाटत नाही. इतकी कमालीची उदासीनता प्राध्यापक वर्गामध्ये दिसते .
तर बहुतेक महाविद्यालयात शिक्षकांची ३० ते ४० % पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठी ना प्राध्यापक संघटना, ना प्राचार्य संघटना ना विद्यार्थी संघटना गंभीर आहेत. वास्तविक ही पदे भरण्यासाठी वैध मार्गाने शासनावर दबाव आणायला हवा . परंतु कोणालाच या स्थिती बाबत गांभीर्य वाटत नाही.
असे असूनही परीक्षा होताहेत महाविद्यालयांचे व विद्यापीठांच्या परीक्षांचे निकाल केवळ समाधानकारक नव्हे तर उत्तम लागताहेत . त्यामुळे शासनही निवांत आहे. आता या परीक्षा कशा होत आहेत व निकाल कसे लागताहेत हे या क्षेत्रातील जाणकारांना चांगलेच माहीत आहे.
आणि हे असेच चालू राहिले तर शासन तरी कशाला उर्वरित पदे भरण्याची तसदी घेईल. नाहीतरी आता ४०% अभ्यासक्रम online शिकविण्या बाबत UGC आग्रही आहेच . याचा फायदा शासनाने घेतला तर नवल वाटायला नको.
आता तर ज्या महाविद्यालयात उपस्थिती बाबत जास्त सवलती मिळतात तेथे विद्यार्थ्यांची गर्दी होवू लागली आहे. एकेकाळी गुणवत्तापूर्ण समजली जाणारी महाविद्यालये ओस पडू लागली आहेत. व नवीन विना अनुदानित महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थी वळू लागले आहेत.
आता हे लोण आर्टस कॉमर्स पुरते मर्यादित राहिले नसून सायन्स , बी.एड . , इंजिनिअरिंग, फार्मसी, कडेही पोहोचू लागले आहे. इतर क्षेत्राचा Data उपलब्ध नाही परंतु इंजिनियरिंग क्षेत्राबाबत जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार B.E झालेल्या उमेदवारांपैकी ६५- ७० % उमेदवार उद्योगक्षेत्रात काम करण्यास पात्र नाहीत .
याचा अर्थ आपण आपल्या तरुणांचे उमेदीचे वय वाया घालवीत आहोत . त्यांना पदवीची खोटी प्रमाणपत्रे देवून त्यांची फसवणूक करीत आहोत . आणि हे खूपच वेदनादायी आहे. ही मुले उच्च शिक्षणाच्या नादी लागून आपल्या आईवडीलांच्या शेती किंवा पारंपरिक व्यवसायापासून दुरावत आहेत व अपेक्षित नोकरी पासून वंचित रहात आहेत . अशी त्यांची दुहेरी फसवणूक होत आहे. वेळीच याकडे समाज धुरीणांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा ही पिढी आपल्याला माफ करणार नाही.
– डॉ. ह. ना. जगताप.
ADVT –
सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.