मी पहात होते तो मानवतेचा महोत्सव!, मी पहात होते मानवी मनातील उदात्त भावनांची सर्वत्र झळकणारी रोषणाई!, मी पहात होते मानवी उदात्तता कृतीत उतरतानाची जणू काही काव्याची उत्कट अभिव्यक्ती.!. मी पहात होते मानवी उच्च भावनांचा सर्वांमधून वाहणारा आणि सर्वानाच एकमेकांशी बांधून ठेवणारा एक अदृष्य प्रवाह !, मानवी मनातील सकारात्मक, उर्जायुक्त भावनांचा आणि कृतिशील विचारांचा तो महोत्सव मी जवळून पहात होते आणि मी स्वतःला भाग्यवान समजत होते.
मी नेहमी साहित्य विषयक कार्यक्रमांच्या व्यासपीठावर असते. पण आज मी एका वेगळ्या आणि आमच्या नेहमीच्या चौकटीबाहेरच्या विषयाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर होते.
अन् समोर दिसत होती विस्तीर्ण हाॅलमध्ये अनेक मांडलेली टेबलं. तत्परतेने सेवा पुरवणारे डाॅक्टर व नर्सेस . टेबलवर एखादा तरूण येऊन झोपत होता. थोड्याच वेळात उठून इतरांत मिसळत होता. रिकाम्या झालेल्या टेबलावर दुसरा तरूण येत होता. रक्ताच्या भरलेल्या पिशव्या पटापट पॅक करून सुरक्षित ठेवल्या जात होत्या. महारक्तदान शिबिराचा कार्यक्रम चालू होता. उत्साहाने आलेल्या तरूणांचे प्रसन्न हसरे चेहरे त्यांच्या अंतरंगाचे प्रतिबिंब होते. येता येता सहजच खुडून आणलेले फूल दुसर्याला देऊन टाकावे इतक्या सहजतेने ते आपले शरीरातील रक्त देत होते. आपल्या रक्ताने कोणाचे तरी प्राण वाचणार आहेत. तो कोण आहे हे माहिती नाही. असे असतानाही आपल्याकडून कोणाचे तरी प्राण वाचवले जावेत या विचाराने प्रेरित झालेले उत्साही तरूण आनंदाने येतात. रक्तदान करून त्या दानाचे श्रेयही न घेता अलिप्तपणे उत्साहाने निघून जातात. माझ्यासाठी हा एक अनुभव नाविन्यपूर्ण होता. नेहमीच मला मला म्हणणारी आणि काहीतरी घेण्यासाठीच भांडणारी माणसं आपण सभोवताली पाहात असतो.अशावेळेस देण्यासाठी आणि तेही रक्त देण्यासाठी हिरीरीने पुढे सरसावलेले ही मंडळी पाहून मला गहिवर दाटून येत होता. समोर असलेल्या तरूणांचे शिक्षण किती आहे? त्याचे ज्ञान किती आहे? त्याचे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक स्थान कोणते आहे असले फिजूल प्रश्न तिथे गळून पडत होते. रक्तदानासाठी आलेल्या तरुणाची माझ्यादृष्टीने एकच जात होती. देवत्वाचा अंश लाभलेला तो खूप मोठा माणूस होता.
आणि ….या सर्व तरूणांचे प्रेरणास्थान असलेला वेताळ प्रतिष्ठानचा सर्वेसर्वा डाॅक्टर प्रा. सचिन परूळकर हा सकाळपासून तीन वाजेपर्यंत सर्व कार्यक्रमांचे नियंत्रण करत होता. कुठून येत असेल ही उर्जा? कुठून येत असेल ही कार्यशक्तीची प्रेरणा? सचिनबरोबर काम करणारे सर्पमित्र महेश राऊळ, सचिन गावडे, नाना राऊळ, किरण तुळसकर, प्रज्ज्वल परूळकर, विवेक तिरोडकर,सावंत बंधू इत्यादी सर्व सदस्यही तितकेच कौतुकास पात्र आहेत.
वेताळ प्रतिष्ठान व आनंदयात्री वाङ्मय मंडळ यांचा निष्ठावान सदस्य गुरूदास तिरोडकर याच्या स्मरणार्थ हे महारक्तदान शिबीर आयोजित केलेले होते. गुरूदासचे अकाली निघून जाणे यामुळेच वेताळ प्रतिष्ठान व आनंदयात्री वाङ्मय मंडळ यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. प्रत्येकाच्या मनात एक दुखरी आणि खोल अशी जखम आहे. गुरूच्या स्मृतींना अभिवादन करून रक्तदान शिबिराची सुरूवात करण्यात आली.
या युवकाने रक्तदात्यांची रेखाचित्रे रेखाटली होती. तीही विनामूल्य. ती रेखाचित्रे , प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह माझ्याहस्ते रक्तदात्यांनी वितरित करण्यात आले. पण देवत्व लाभलेल्या तेथील सर्वाना मी मनोमन नतमस्तक झाले होते.