✍️ रूपेश पाटील.
सावंतवाडी : येथील नगरपरिषदेची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होताना दिसत आहे. आज प्रभाग 10 मध्ये शिंदे शिवसेनेचे दोन ‘परब’ एकत्र येऊन आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करताना अनुभवयास मिळाले. शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब व युवा शिवसेना पदाधिकारी सूरज परब यांनी वार्ड क्रमांक 10 मध्ये शिंदे शिवसेनेचे उमेदवार तानाजी वाडकर व सौ. वेदिका सावंत यांचा ‘डोअर टू डोअर’ प्रचार केला. बेधडक संजू परब आणि मृदू व मितभाषी सूरज परब या दोघांनीही आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाने सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत कोणत्याही पद्धतीने निवडणूक खेचून आणण्यासाठी आता कंबर कसली आहे. आज वार्ड क्रमांक 10 मधील दोन्ही परबांनी केलेल्या झंझावाती प्रचारामुळे शिंदे शिवसेनेला प्रचंड ऊर्जा प्राप्त झाली आहे. दरम्यान यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत आपणास शंभर टक्के यश मिळेल आणि सर्वच्या सर्व जागा जिंकून आपलीच सत्ता येणार असल्याचे ‘सत्यार्थ’जवळ स्पष्ट केले. तर सुरज परब यांनी शांतपणे प्रचार करत कोणतीही प्रतिक्रिया न देता केवळ स्मितहास्य दिले. दरम्यान दोन्ही परबांनी जोरदार प्रचार केल्यामुळे शिंदे शिवसेनेला चांगलीच आघाडी मिळाली असून ही आघाडी टिकवून ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे समजते.



