सावंतवाडी: न्हावेली पंचायत समिती मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार पीटर फर्नांडिस यांनी झंझावाती प्रचार दौरा सुरू केला असून, या दौर्याला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घरोघरी भेटी देत ते आपली भूमिका आणि विकासाचा अजेंडा मांडत असून, मतदारांशी थेट संवाद साधण्यात ते यशस्वी ठरत आहेत.
प्रचारादरम्यान देशातील काँग्रेसचे योगदान तसेच विकासात्मक कामांचा आढावा घेत फर्नांडिस यांनी महाविकास आघाडीची दिशा आणि उद्दिष्टे मतदारांसमोर मांडली. स्थानिक प्रश्नांवर चर्चा करताना पायाभूत सुविधा, रोजगार, शिक्षण आणि आरोग्यसेवा यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला.

न्हावेलीबरोबरच आरोस, पाडलोस, साटेली आणि दांडेली या भागांतही फर्नांडिस यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असून, नागरिकांनी त्यांचे स्वागत करत संवादात सक्रिय सहभाग नोंदवला. प्रचार दौऱ्यामुळे मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण तापले असून, येत्या काळात प्रचार आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.



