सावंतवाडीत मतदान जनजागृती रॅली व पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद! ; ‘मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग’, मुंबई विद्यापीठ सिंधुदुर्ग उपपरिसर, सावंतवाडी समाजकार्य विभाग यांचे संयुक्त आयोजन.

सावंतवाडी :  मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग व मुंबई विद्यापीठ सिंधुदुर्ग उप परिसर, सावंतवाडी समाजकार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सावंतवाडी शहरामध्ये मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या जनजागृती रॅलीसाठी तहसीलदार श्रीधर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खंदरकर, मुंबई विद्यापीठाचे डायरेक्टर  श्रीपाद वेलिंग, सावंतवाडी नगरपालिकेचे अधिकारी गोविंद गवंडे, मेरा युवा भारतचे माजी स्वयंसेवक जयराम जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य अमर निर्मळे, अनुभव शिक्षा केंद्राचे सहदेव पाटकर, प्रा. पुनम गायकवाड, प्रा. कालिदास शिंदे, पब्लिक रिलेशन फाऊंडेशनच्या फातिमा मकानदार तसेच अनुभव साथी सुदीप दिगवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


सावंतवाडी शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान विद्यार्थी व स्वयंसेवकांनी मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या घोषणा दिल्या. “मतदान करुया, लोकशाही रुजवूया” असा प्रभावी संदेश देत नागरिकांना मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रेरित करण्यात आले.
रॅलीदरम्यान मतदान जनजागृती विषयावर प्रभावी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. पथनाट्याच्या माध्यमातून मतदान न केल्यामुळे समाजावर होणारे दुष्परिणाम, लोकशाहीतील नागरिकांची भूमिका व जबाबदारी अतिशय परिणामकारक पद्धतीने मांडण्यात आली. उपस्थित नागरिकांनी या पथनाट्याला चांगला प्रतिसाद दिला.
सदर उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली असून, लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात हे आयोजन यशस्वी ठरले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles