वाचक मित्राही, २०१४ पासून बी. एड. हा कोर्स दोन वर्षाचा झाला. नेमके त्याच दरम्यान महाराष्ट्रात तरी शिक्षक भरती बंद झाली. (आता नुकतीच तुरळक सुरु झाल्याचे दिसते.), त्यामुळे बी एड .कडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला. प्रचंड संख्येने उघडलेल्या बी.एड. कॉलेजेसने मग विद्यार्थी मिळविण्यासाठी नवीन फंडे सुरु केले. काही महाविद्यालयांनी फीमध्ये सवलत , काहींनी उपस्थितीमध्ये सवलत, काहींनी पाठ न घेण्याची व प्रात्यक्षिके पूर्ण न करण्याची सवलत अशा विविध प्रकारांनी विद्यार्थी आकर्षित करून महाविद्यालये टिकवून ठेवली.
आता तर नुकतेच बी .एड झालेले विद्यार्थी म्हणताहेत आम्ही एक्स्टर्नली बी. एड केले आहे. अशा पद्धतीने सध्या बी. एड. महाविद्यालये चालू आहेत .
आता NCTE ने नवीन चार वर्षीय बी. एड. चा मसुदा प्रसिद्ध केलेला आहे. म्हणजे आता दोन वर्षीय, चार वर्षीय व एक वर्षीय अशा तिन्ही प्रकारचे बी .एड कोर्सेस असणार आहेत . चार वर्षीय बी.एड. मध्ये पुन्हा चार प्रकार असणार आहेत . पायाभूत सारासाठी म्हणजे बालवाटिका १, २, ३ व पहिली दुसरीला शिकविण्यासाठी वेगळा कोर्स , तिसरी ते पाचवी म्हणजेच पूर्वतयारी स्तरासाठी वेगळा कोर्स , सहावी ते आठवी म्हणजे मध्यस्तर यासाठी एक कोर्स तर ९वी ते १२वी म्हणजे माध्यमिक साठी वेगळा कोर्स.
म्हणजे पायाभूत स्तरासाठीचा बीएड कोर्स केला तर तो शिक्षक केवळ त्या स्तरालाच शिकवायला पात्र होईल. असेच इतर स्तराबद्दलही असावे . बरे मग दोन वर्षीय बी.एड करणारे व एक वर्षीय बी .एड करणारे कोणत्या स्तराला शिकवायला पात्र असणार आहेत ? समजा एका शिक्षकाने मध्यस्तरा साठीचा बीएड कोर्स पूर्ण करून सध्याच्या माध्यमिक शाळेत नोकरीला लागला आता त्याच शाळेत वरच्या वर्गाला शिकविण्यासाठी Vacancy निर्माण झाली तर त्याला ती जागा मिळणार नाही अगोदरच पटसंख्या व पदे यांचा गोंधळ सुरु असताना पुढे हे गोंधळ वाढत जातील .
आता ज्या विद्यार्थाने पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे तो केवळ एक वर्षीय बी .एड . पूर्ण करून माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करण्यास पात्र होणार .
चार वर्षीय विविध स्तरासाठीच्या बी एड . अभ्यासक्रमामध्ये मुख्यभाग समान आहे व थोडा भाग स्तराप्रमाणे बदललेला आहे. आणि असे जर आहे तर सर्वांसाठी एकच चारवर्षीय बी.एड कोर्स तयार करून Optional ला स्तरासंबंधीचा अभ्यासक्रम ठेवणे व्यवहार्य ठरेल .
सध्या एखाद्या संस्थेला हा चार वर्षीय अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी परवानगी मागायची तर ती कोणत्या स्तरासाठी हा प्रश्न पडत आहे . तसेच आता पुढे विद्यार्थ्यांनाही हा प्रश्न पडणार आहे की , आपण नेमके कोणते बी.एड करावे?
NCTE ने गेल्या काही वर्षात इतके विसंगत निर्णय घेतले आहेत. ( उदा. दोन वर्षीय बी.एड मध्ये शिक्षक नेमताना एक एम ए मानसशास्त्र व एक एम . ए . तत्वज्ञान किंवा समाज शास्त्र असे शिक्षक नेमावेत कारण केवळ एम .एड झालेल्यांना मानसशास्त्र किंवा तत्वज्ञानाचे पुरेसे ज्ञान नसते . चार वर्षीय बी .एड अभ्यासक्रमामध्ये मानसशास्त्र , तत्त्वज्ञान यांचा अभ्यासक्रम पूर्वीच्या एक वर्षीय बीएड च्या अभ्यासक्रमाच्या तुलनेत १/३ देखील ठेवलेला नाही ) कदाचित अशा निर्णयां मुळेच आता NCTE चा विलय HEI मध्ये केला गेलेला असावा.
निदान या नव्या संस्थेने तरी शिक्षण शास्त्रातील गोंधळ कमी करावा .
( दि.१४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी SSS College of Education, धाराशिवमध्ये MSSTEA चे वार्षिक अधिवेशन होत आहे त्यानिमिताने…)
✍️ डॉ. ह. ना. जगताप



