अहमदाबाद : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं आयसीसी टी-20 विश्वचषकात नवा इतिहास घडवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवला आणि भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. आयसीसी टी-20 विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवर तिसऱ्यांदा जिंकणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरला.
न्यूझीलंडला पराभूत करुन पुन्हा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. भारतीय संघातील खेळाडूंचे कुटुंबीय देखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या तीन फलंदाजांनी न्यूझीलंडच्या आक्रमणाच्या अक्षरश: चिंधड्या उडवल्या. भारताने सलामीच्या फलंदाजांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर भारतानं 20 षटकांत पाच बाद 255 धावांची मजल मारली होती.भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा अख्खा डाव 159 धावांत कोलमडला. भारताकडून जसप्रीत बुमरानं चार, तर अक्षर पटेलनं तीन विकेट्स काढून न्यूझीलंडला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली.
विश्वचषक जिंकल्यानंतर जय शाह, सूर्यकुमार, गंभीर हनुमानाच्या मंदीरात-
टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर तसेच सर्व सेलिब्रेशन झाल्यानंतर आयसीसीचे अध्यक्ष जय शाह, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षत गौतम गंभीर टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन अहमदाबादमधील हनुमान मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. दरम्यान, यावेळी अनेक फोटोग्राफर आणि माध्यमांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. परंतु जय शाह यांनी सगळ्यांना मंदिराच्या बाहेर जाण्याची विनंती केली. तसेच मंदिराच्या खिडकीवर एक पडदा होता, तिकडूनही काही लोक फोटो-व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करत होते. हे पाहता जय शाह यांनी मंदिरातील कर्मचाऱ्यांना खिडकीचा पडदाही लावायला सांगितला. दरम्यान, मंदिरात आणि मंदिराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने जय शाह यांनी खबरदारी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.



