सावंतवाडी ::तालुक्यातील कलंबिस्त इंग्लिश स्कूल,कलंबिस्तमध्ये दहावी नंतर पुढे काय? या करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मालवण येथील प्रसिद्ध करिअर समुपदेशक नेहा करंदीकर-हुनारी यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर कलंबिस्त प्रशालेचे माजी मुख्याध्यापक सिताराम सुर्वे,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुभाष राऊळ, मुख्याध्यापक अभिजीत जाधव, ज्येष्ठ शिक्षक शरद सावंत आदी उपस्थित होते.
या मार्गदर्शन सत्रामध्ये करिअर समुपदेशक नेहा करंदीकर यांनी विद्यार्थ्यांना दहावी -बारावीनंतरची करिअरची निरनिराळी क्षेत्रे व त्यांमधील विविध संधी यांबाबत माहिती दिली. तसेच करिअर निवडताना आपली आवड,अंगभूत कौशल्ये,व्यक्तिमत्त्व विकास यांबाबतही विविध उदाहरणे देत सविस्तर विवेचन केले. आपला कल कसा ओळखावा याबाबतही महत्त्वाची मार्गदर्शक सूत्रे सांगितली.
या चर्चात्मक शिबीरात पालक श्री. सत्यविजय राऊळ,श्रीम. दळवी यांनी सहभाग घेत या करिअर मार्गदर्शन शिबिरामुळे करिअर संदर्भात विविधांगी माहिती मिळाली व अशी चर्चासत्रे विद्यार्थी व पालकांसाठी निश्चितच दिशादर्शक व मोलाची असल्याचे मत व्यक्त केले. या करिअर मार्गदर्शन शिबिराचा कलंबिस्त, वेर्ले,सावरवाड व सांगेली येथील विद्यार्थी व पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून लाभ घेतला. या मार्गदर्शन शिबीराच्या यशस्वीतेसाठी कलंबिस्त हायस्कूलच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. या मार्गदर्शन सत्राचे सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी केले.



