“जीवनाच्या क्रिकेट पिचवर सावध राहा, थोडं पुढे गेलात तरी मागून आऊट करणारे टपलेलेच असतात!” ; भाजपा युवा नेते विशाल परब यांची झणझणीत फटकेबाजी! ; पंचक्रोशी प्रीमियर लीगचा दणदणीत समारोप.

सावंतवाडी: “जीवन आणि क्रिकेट हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत… तुम्ही जरा क्रीजच्या बाहेर गेलात, की स्टंप आऊट करणारे तयारच असतात!” — असा थेट आणि तडाखेबाज संदेश देत विशाल परब यांनी सातार्डा येथील क्रिकेट मैदान अक्षरशः गाजवले. त्यांच्या या “मुलुख मैदानी बॅटिंग”ने उपस्थित तरुणाईत प्रचंड उत्साह उसळला.
श्री देव रवळनाथ बॉईज क्लब, सातार्डा यांच्या वतीने आयोजित पंचक्रोशी प्रीमियर लीग (PPL 2026) क्रिकेट स्पर्धेचा रंगतदार समारोप मोठ्या जल्लोषात पार पडला. तीन दिवस चाललेल्या या क्रिकेट महासोहळ्याचा शेवट विशाल परब तसेच सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
आपल्या भाषणात परब यांनी जीवनातील स्पर्धा आणि क्रिकेटमधील खेळी यांची सांगड घालत तरुणांना सजगतेचा इशारा दिला. “आजकाल समोरून वार करणारे कमी, पण पाठीमागून स्टंप आऊट करणारे जास्त झाले आहेत… त्यामुळे पुढे जाताना मागेही पाहा!” असा मार्मिक टोला त्यांनी लगावला. त्यांच्या या शब्दांनी मैदानात टाळ्यांचा कडकडाट झाला.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. युवकांचा जबरदस्त सहभाग, खेळाडूंची जिद्द आणि प्रेक्षकांचा उत्साह यामुळे संपूर्ण सातार्डा क्रिकेटमय झाले होते.
समारोप सोहळ्यात विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते चषक व आकर्षक पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. विशाल परब यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष झळाळी प्राप्त झाली. त्यांच्या सभोवती नेहमीप्रमाणे तरुणांचा मोठा गराडा पाहायला मिळाला.

आ
या कार्यक्रमास साई कवठणकर, अजित कवठणकर, प्रसाद आसोलकर, प्रवीण मांजरेकर, सातार्डा ग्रामपंचायत सदस्या अर्चना धारगळकर, दशरथ वेंगुर्लेकर, शर्मिला मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री देव रवळनाथ बॉईज क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेले परिश्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles