सावंतवाडी : सिंधुदुर्गातील लेखक समीर वेंगुर्लेकर यांच्या अभिनंदन प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या वारसदार कादंबरीचे प्रकाशन सावंतवाडी येथे करण्यात आले.
नाटककार सिद्धार्थ तांबे यांच्या स्मरणार्थ घेतलेल्या साहित्य संमेलनात लेखिका आणि कवयित्री संध्या तांबे यांच्या हस्ते वारसदार कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष कवी अजय कांडर, संमेलनाचे प्रमुख पाहुणे कवी वीरधवल परब, सांस्कृतिक कार्यकर्ते प्रा एस एन पाटील संमेलनाचे आयोजक कवी मधुकर मातोंडकर आणि कवी विठ्ठल कदम आदी उपस्थित होते.वारसदार ही कादंबरी आशयघन कादंबरी असून तिचं लेखन वाचताना वाचकाला ते खेळवून ठेवते. या अर्थाने लेखक म्हणून समीर वेंगुर्लेकर यशस्वी झाले आहेत.त्यामुळेच त्यांच्याकडून पुढील काळात अशा दीर्घ लेखनाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कौटुंबिक आणि राजकीय पातळीवर घडत जाणारी ही कादंबरी वाचकाच्या दृष्टीने प्रचंड उत्सुकता वाढविणारी असून ग्रामीण भागातील माणसाच्या परंपरेच्या मानसिकतेचा नेमका वेध ती घेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विपुल प्रमाणात कविता लिहिली जाते. पण कथा आणि कादंबरी लेखन अपवादाने केले जात असून या अपवादाने केल्या जाणाऱ्या लेखनात समीर वेंगुर्लेकर यांचे नाव अग्रक्रमाने आपल्याला आता घ्यावे लागेल.



