मुंबई : चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात इतिहास घडवला आहे. चेन्नईने होम टीम मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय मिळवला आहे. संजू सॅमसन याने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने मुंबईसमोर 208 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईला या विजयी धावांचा पाठलाग करताना पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. इम्पॅक्ट प्लेअर अकील होसेन याने 4 विकेट्स घेत फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. चेन्नईसमोर मुंबईचा डाव हा 19 ओव्हरमध्ये 104 रन्सवर आटोपला. चेन्नईने अशाप्रकारे 103 धावांच्या फरकाने सामना नावावर केला. चेन्नईचा हा धावांबाबत इतिहासातील सर्वात मोठा विजय ठला. तर मुंबईचा धावांबाबत हा सर्वात मोठा पराभव ठरला. तसेच मुंबईचा हा या मोसमातील एकूण पाचवा तर वानखेडे स्टेडियममधील सलग आणि एकूण तिसरा पराभव ठरला.

संजू सॅमसन आणि इम्पॅक्ट प्लेअर अकील होसेन हे दोघे चेन्नईच्या विजयाचे शिल्पकार ठरले. संजूने केलेल्या शतकी खेळीमुळे चेन्नईला मुंबईसमोर 200 पेक्षा अधिक धावांचं आव्हान ठेवता आलं. तर फिरकीपटू अकील होसेन याने 4 विकेट्स घेत मुंबईच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. संजूने नाबाद 101 धावा केल्या. संजूने यापैकी 76 धावा या चौकार आणि षटकाराच्या मदतीने केल्या. संजूने या खेळीत 10 चौकार आणि 6 षटकार लगावले. संजूला या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
सामन्यात काय झालं?
मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईसाठी संजूच्या शतकाव्यतिरिक्त इतर कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने 22 तर डेवाल्ड ब्रेव्हीस याने 21 धावांचं योगदान दिल. तर इतरांपैकी कुणालाही 20 हा आकडा गाठता आला नाही. मुंबईसाठी अश्वनी कुमार आणि अल्लाह गजनफर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मिचेल सँटनर आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी 1-1 फलंदाजाला आऊट केलं.
मुंबईचे फलंदाज फ्लॉप –
मुंबईच्या फलंदाजांनी विजयी धावांचा पाठलाग करताना निराशा केली. पलटणच्या 3 प्रमुख फलंदाजांना भोपळा फोडता आला नाही. दानिश मालेवार, नमन धीर आणि शेरफेन रुदरफोर्ड हे तिघे आले तसेच गेले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा जोडीने 56 चेंडूत 76 धावांची भागीदारी करुन विजयाची आशा कायम ठेवली होती. मात्र हे दोघे आऊट झाल्यानंतर मुंबईचा पराभव निश्चित झाला. मुंबईसाठी तिलक वर्मा याने सर्वाधिक 37 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव याने 36 धावा जोडल्या. या दोघांव्यतिरिक्त मुंबईच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. चेन्नईसाठी अकील व्यतिरिक्त इतर 5 गोलंदाजांनीही योगदान दिलं. नूर अहमद याने 2 विकेट्स मिळवल्या. तर मुकेश चौधरी, अंशुल कंबोज, जेमी ओव्हरटन आणि गुरनजरप्रीत सिंह या चौकडीने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.



