सावंतवाडी : कोकणातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेने पुन्हा एकदा आपल्या कार्याची छाप उमटवली आहे. सावंतवाडीतील माठेवाडा येथील मोफत वाचनालयातून अभ्यास करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र पोलीस भरतीत यश संपादन करत संस्थेचा गौरव वाढवला आहे.
गेल्या वीस वर्षांपासून ज्येष्ठ समाजसेवक निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील पाचही जिल्ह्यांत सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, रोजगार व प्रशिक्षण क्षेत्रात व्यापक कार्य सुरू आहे. या कार्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ५५ अत्याधुनिक मोफत वाचनालयांची उभारणी, ज्याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांना होत आहे.
सावंतवाडीच्या माठेवाडा येथील वाचनालय गेली आठ वर्षे कार्यरत असून, स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सर्व साहित्य येथे उपलब्ध आहे. या वाचनालयामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना नवे आयुष्य मिळाले आहे. आतापर्यंत २० पेक्षा अधिक विद्यार्थी शासन सेवेत दाखल झाले आहेत.
नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत खालील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले –
अक्षय अंकुश मोर्ये (मोरे, ता. कुडाळ) — महाराष्ट्र पोलीस, सिंधुदुर्ग.
तुकाराम सुभाष आईर (वाफोली, ता. सावंतवाडी) — महाराष्ट्र पोलीस, सिंधुदुर्ग.
विष्णु राधाकृष्ण केरकर (मळगाव, ता. सावंतवाडी) — महाराष्ट्र पोलीस, सिंधुदुर्ग.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे तसेच वाचनालयाचे समन्वयक व सामाजिक कार्यकर्ते अॅड. नकुल पार्सेकर यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
“जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाले, तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठे यश मिळवू शकतात,” याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
दरम्यान, जिजाऊ संस्थेच्या मोफत वाचनालयाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



