सावंतवाडी : “देवस्थान हे केवळ पूजा-अर्चेचे केंद्र नसून समाजाला एकत्र आणणारी श्रद्धेची शक्ती आहे. अशा धार्मिक सोहळ्यांतून आपल्या संस्कृतीची ओळख आणि भावी पिढीला संस्कारांची दिशा मिळते,” असे प्रेरणादायी विचार व्यक्त करत भाजप युवा नेते विशाल परब यांनी आरोंदा येथील श्री सातेरी भद्रकाली पंचायतनमध्ये आयोजित “सप्रक्षेपण विधी सोहळा २०२६” मध्ये उपस्थित भाविकांना संबोधित केले.
आरोंदा परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या श्री सातेरी भद्रकाली पंचायतन येथे आयोजित हा सोहळा अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. पारंपरिक वाद्यांचा गजर, मंत्रोच्चार आणि जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
या विशेष सोहळ्यास भाजप युवा नेते विशाल परब यांनी आपल्या सौभाग्यवती सौ. वेदिका परब यांच्यासह सदिच्छा भेट देत देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीचरणी नतमस्तक होत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह आरोंदा परिसरातील जनतेच्या सुख-समृद्धी, आरोग्य, शांती आणि प्रगतीसाठी मनोभावे प्रार्थना केली.
यावेळी विशाल परब यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रभावी वक्तृत्वातून उपस्थित भाविकांची मने जिंकली. “आपल्या गावातील देवस्थानांची परंपरा ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. श्रद्धा आणि एकतेच्या बळावर समाज अधिक सक्षम आणि प्रगत होतो. अशा धार्मिक सोहळ्यांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते,” असे ते म्हणाले. त्यांच्या भाषणातील आत्मीयता, समाजाविषयीची बांधिलकी आणि धार्मिक भावनेबद्दलचा आदर यामुळे उपस्थितांकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळी ऊर्जा लाभली असून तरुणांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेक भाविकांनी विशाल परब यांच्या साधेपणाचे, जनसंपर्काचे आणि प्रभावी नेतृत्वाचे कौतुक केले.
यावेळी रघुनाथ उर्फ बबन गणेश नाईक, उल्हास दत्ताराम नाईक, सुदर्शन गोपाळ नाईक, विष्णू अनंत नाईक यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यामुळे आरोंदा परिसरात भक्ती, एकात्मता आणि उत्साहाचे मंगलमय वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. श्रद्धा आणि संस्कृतीची परंपरा जपत समाजाला एकत्र आणणारा हा सोहळा नागरिकांच्या स्मरणात कायम राहणारा ठरला.



