वेंगुर्ला : तालुक्यातील रेडी नागोळेवाडी येथील प्राथमिक शाळेची जीर्ण अवस्था पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यांत आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल चिंता दाटून आली होती. मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या, अपुऱ्या सुविधा आणि असुरक्षित वातावरणात शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांसाठी ग्रामस्थांनी नव्याने शाळा उभारण्याचा निर्धार केला. या भावनिक आणि सामाजिक उपक्रमाला महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांनी संवेदनशील प्रतिसाद देत शाळेसाठी तब्बल एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
“गावातील प्रत्येक मुलाला सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे” या भावनेतून विशालजी परब यांनी रेडी नागोळेवाडी येथे प्रत्यक्ष भेट देत ग्रामस्थांच्या हाती मदतीचा धनादेश सुपूर्द केला. त्यांच्या या मदतीमुळे गावकऱ्यांच्या नव्या शाळेच्या स्वप्नाला मोठा आधार मिळाला असून अनेकांच्या डोळ्यांत समाधानाश्रू तरळले.
गावातील लहान मुलांना चांगल्या सुविधा, सुरक्षित वातावरण आणि उज्ज्वल भविष्य मिळावे, यासाठी ग्रामस्थ एकजुटीने उभे राहिले आहेत. अशा वेळी विशाल परब यांनी दिलेला मदतीचा हात हा केवळ आर्थिक आधार नसून गावातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दिलेला विश्वासाचा शब्द असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी रेडीचे सरपंच भाई राणे, सागर रेडकर, संजय कांबळी, दिनेश बुगडे, शिवा सुर्याजी, परेश सुर्याजी, जयेश राणे, संजय कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांनी विशालजी परब यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि शिक्षणावरील प्रेमाचे मनापासून कौतुक करत त्यांचे आभार मानले.



