✍️ रूपेश पाटील.
वाचक मित्रहो, राजकारणाच्या रंगमंचावर कधी कधी एखादा शब्द, एखादी उपमा किंवा एखादं वक्तव्य अशी ठिणगी टाकून जातं, की त्यातून निर्माण होणारी आग सत्तेच्या दालनांपर्यंत पोहोचते. सध्या देशाच्या डिजिटल विश्वात असाच एक शब्द प्रचंड गाजतो आहे. “कॉकरोच”. सोशल मीडियावर “कॉकरोच जनता पार्टी” नावाने उभ्या राहिलेल्या या डिजिटल लाटेने राजकीय, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात मोठी खळबळ उडवली आहे. प्रश्न एवढाच नाही की हे आंदोलन काय आहे; खरा प्रश्न आहे. या आंदोलनामागे उसळणारा तरुणाईचा राग नेमका कोणाविरोधात आहे?
‘कॉकरोच’चं भविष्य काय?, सरकार डिजिटल आंदोलन चिरडणार की नव्या पिढीचा राजकीय भिडू व्यवस्थेला हादरा देणार?
देशाच्या सरन्यायधीशांच्या एका वक्तव्यानंतर अचानक सोशल मीडियावर मीम्स, पोस्ट्स, व्हिडिओज आणि व्यंगात्मक मोहिमांचा पूर आला. एका बाजूला सत्ताधाऱ्यांविषयी वाढती अस्वस्थता, बेरोजगारी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचे कथित निर्बंध, संस्थांवरील अविश्वास आणि राजकीय दडपशाहीविरोधातील संताप या सर्व भावनांना “कॉकरोच” या प्रतीकातून अभिव्यक्ती मिळू लागली. “तुम्ही आम्हाला कितीही चिरडलंत तरी आम्ही पुन्हा उभे राहू,” हा संदेश या आंदोलनातून दिला जात असल्याचे स्पष्ट दिसते.
कॉकरोच हा प्राणी अनेकदा तिरस्काराचा विषय ठरतो. पण त्याचं एक वैशिष्ट्य जगभर मान्य आहे, तो सहज संपत नाही. अंधारात, दडपणाखाली, विषारी वातावरणातही तो जिवंत राहतो. आणि कदाचित म्हणूनच आजची अस्वस्थ तरुणाई स्वतःला “कॉकरोच” म्हणवून घेत आहे. ही केवळ व्यंगात्मक ट्रोलिंग नाही; हा व्यवस्थेविरोधातील डिजिटल प्रतिकाराचा नवीन चेहरा आहे.
मात्र, जिथे प्रतिकार असतो तिथे प्रतिहल्लाही असतोच. त्यामुळे या आंदोलनाला “देशविरोधी”, “दहशतवाद प्रेरित” किंवा “व्यवस्था अस्थिर करणारे” ठरवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सोशल मीडियावरील काही हॅशटॅग्स आणि पोस्ट्सचा आधार घेत संपूर्ण आंदोलनावर संशयाची सावली टाकली जात आहे. इतिहास साक्षी आहे — सत्तेला प्रश्न विचारणाऱ्यांना अनेकदा राष्ट्रविरोधी ठरवण्याचा प्रयत्न झाला आहे. पण प्रत्येक आंदोलन दहशतवाद नसतं आणि प्रत्येक असहमती देशद्रोह नसतो, हे लोकशाहीत विसरून चालणार नाही.
खरं तर “कॉकरोच जनता पार्टी” ही कोणती अधिकृत राजकीय संघटना नाही. ती आहे एक मानसिक अवस्था. व्यवस्थेविषयीचा अविश्वास, उपेक्षेची भावना आणि “आमचं कोणी ऐकत नाही” या पिढीच्या वेदनेतून जन्मलेली डिजिटल चळवळ. पारंपरिक राजकारणावरचा विश्वास कमी होत असताना सोशल मीडिया हीच नवी संसद बनत चालली आहे. इथे ट्रोल्स आहेत, व्यंग आहे, राग आहे, पण त्याचबरोबर वास्तवातील वेदनाही आहेत.
आता प्रश्न असा आहे की सरकार या डिजिटल असंतोषाकडे कशा नजरेने पाहणार? दडपशाही, बंदी, खटले आणि सोशल मीडिया नियंत्रणाच्या माध्यमातून ही लाट रोखण्याचा प्रयत्न होणार का? की व्यवस्थेला हे मान्य करावं लागणार की तरुणाईच्या मनात खदखद आहे आणि तिला केवळ प्रचाराने शांत करता येणार नाही?
कारण इतिहास सांगतो “विचारांना तुरुंग नसतो.ज्यांना काल “विद्रोही” म्हटलं गेलं, त्यांनाच उद्या “परिवर्तनाचे शिल्पकार” म्हणून गौरवलं गेलं आहे.
कदाचित “कॉकरोच” ही केवळ सोशल मीडिया ट्रेंडची तात्पुरती हवा ठरेल. पण कदाचित हीच ठिणगी नव्या राजकीय युगाची सुरुवातही ठरू शकते. कारण जेव्हा व्यवस्था लोकांच्या मनात भीती निर्माण करते, तेव्हा व्यंग हेच सामान्य माणसाचं सर्वात मोठं शस्त्र बनतं.
आणि म्हणूनच…आजचा सर्वात मोठा प्रश्न “कॉकरोच” कोण आहे?, हा नाही, तर एवढाच आहे. व्यवस्था लोकांना इतकं असहाय्य का वाटू लागली आहे?, तूर्तास एवढेच.



