वेंगुर्ला : शिक्षण घेत असतानाच स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे धाडस दाखवत दोन तरुणांनी स्वयंरोजगाराचा आदर्श निर्माण केला आहे. वेंगुर्ला येथील शिरोडा नाका परिसरात, बँक ऑफ इंडिया शेजारी सुरू करण्यात आलेल्या “प्रेमाचा चहा” या नव्या उपक्रमाचे उद्घाटन सौ. वेदिकाताई परब यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी मेडिकलचे शिक्षण घेत असताना स्वतःच्या कष्टाच्या जोरावर व्यवसाय सुरू करणारे कृष्णा कराडे आणि अविनाश काळे यांचे अभिनंदन करताना वेदिकाताई परब यांनी त्यांच्या जिद्दीचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या, “कोणताही व्यवसाय लहान नसतो. शिक्षणासोबत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा तुमचा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे. अशा युवकांकडून समाजाला सकारात्मक दिशा मिळते.”
यावेळी त्यांनी भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या माध्यमातून लवकरच उभारण्यात येणाऱ्या भव्य हॉस्पिटलमध्ये स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असेही स्पष्ट केले.
या उद्घाटन सोहळ्यास जि.प. सदस्या सौ. सुजाता पडवळ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, क्रीडा सभापती सचिन शेटये, नगरसेवक रवी शिरसाठ, युवराज जाधव, नगरसेविका सौ. काजल कुबल, वृंदा गवंडळकर, हसिना मकानदार, रसिका मठकर, श्रेया मयेकर, दिपेश केरकर, साईप्रसाद भोई, शरद मेस्त्री, सुधीर डिचोलकर, योगेश नाईक, डॉ. शशिकांत परब, शेखर मालवणकर, नियाज मकानदार, घनशाम मोरजे, सौरभ भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘प्रेमाचा चहा’ हा केवळ चहाचा स्टॉल नसून तरुणांच्या आत्मविश्वासाचा, मेहनतीचा आणि स्वयंरोजगाराच्या नव्या पर्वाचा शुभारंभ असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



