✍️ रूपेश पाटील.
कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी १२ वर्षांच्या कारकीर्दीचा लेखाजोखा मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी मोदी सरकारच्या विविध निर्णयांचे आणि विकासकामांचे जोरदार समर्थन करत त्यांची कारकीर्द ही भारताच्या नव्या उभारणीचा सुवर्णकाळ असल्याचे प्रतिपादन केले.
कणकवली येथील प्रहार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ना. राणे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या सूचनेनुसार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली देशभर मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला जात आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ यशस्वी सेवा देत अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. २०१४ पूर्वीचा भारत आणि आजचा भारत यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असून देशाच्या विकासाचा, राष्ट्रीय सुरक्षेचा, सांस्कृतिक पुनर्जागरणाचा आणि जागतिक प्रतिष्ठेचा नवा अध्याय मोदी यांच्या नेतृत्वाखाली लिहिला गेला आहे, असे त्यांनी सांगितले.
ना. राणे म्हणाले, “एकेकाळी स्वतःला हिंदू म्हणताना अनेकांना संकोच वाटत होता. मात्र आज देशात अभिमानाने ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ असे म्हणण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदू समाजाच्या मनात असलेली असुरक्षिततेची भावना संपुष्टात आली असून देव, देश आणि धर्म याबाबतचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला आहे.”
-
राम मंदिर उभारणी, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, उज्जैन महाकाल लोक प्रकल्प यांसारख्या सांस्कृतिक आणि धार्मिक पुनरुत्थानाच्या प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, राम मंदिर हा केवळ राजकारणाचा विषय नव्हता, तर कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा आणि अस्मितेशी निगडित विषय होता. शेकडो वर्षांची प्रतीक्षा संपवून मोदींनी तो ऐतिहासिक क्षण देशाला दिला.
तसेच तीन तलाक कायदा, वक्फ बोर्डातील सुधारणा, लँड जिहाद रोखण्यासाठी घेतलेली भूमिका, धर्मस्थळे आणि धार्मिक संपत्तीचे संरक्षण यांसारख्या विषयांवर मोदी सरकारने ठोस निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. पूर्वीच्या सरकारांनी मतांच्या राजकारणासाठी अनेक प्रश्न प्रलंबित ठेवले, मात्र मोदींनी धाडसी निर्णय घेऊन त्यावर मार्ग काढल्याचा दावा त्यांनी केला.
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना ना. राणे म्हणाले की, पूर्वी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर केवळ निषेधाच्या प्रतिक्रिया दिल्या जात होत्या. मात्र आज भारत शत्रूला त्याच भाषेत उत्तर देण्यास सक्षम झाला आहे. दहशतवादाविरोधातील कारवाया, सीमासुरक्षा आणि राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर मोदी सरकारने घेतलेली भूमिका जगभरात भारताची ताकद अधोरेखित करणारी ठरली आहे.
आर्थिक क्षेत्रातही भारताला जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवून देण्याचे श्रेय मोदी सरकारला जाते. पायाभूत सुविधा, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, गरीब कल्याण योजना, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास यांसारख्या अनेक योजनांमुळे देशाच्या विकासाला नवी गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
“आज जगातील कोणत्याही राष्ट्रप्रमुखाला भेटताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेली भगवद्गीता भेट देतात. हा केवळ सन्मान नसून भारताच्या सनातन संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरव आहे,” असेही ना. राणे म्हणाले.
शेवटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या यशस्वी, निर्णायक आणि परिवर्तनवादी कारकीर्दीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “भारताला आत्मविश्वास, विकास, राष्ट्रीय अभिमान आणि जागतिक नेतृत्व देणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.


राम मंदिर उभारणी, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, उज्जैन महाकाल लोक प्रकल्प यांसारख्या सांस्कृतिक आणि धार्मिक पुनरुत्थानाच्या प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, राम मंदिर हा केवळ राजकारणाचा विषय नव्हता, तर कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा आणि अस्मितेशी निगडित विषय होता. शेकडो वर्षांची प्रतीक्षा संपवून मोदींनी तो ऐतिहासिक क्षण देशाला दिला.