सावंतवाडी : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व सावंतवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त केले. याप्रकरणी तिघांविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंभू वीरनोडकर (वय ५०, रा. सावंतवाडी) यांच्या सांगण्यावरून अमित राजेश जाधव (वय २७, रा. ओटवणे) व दत्तप्रसाद शेळके (रा. सावंतवाडी) हे दोघे गुरुवारी (दि. १८) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पेडणेकर सायकल मार्टच्या पाठीमागील परिसरात लोकांकडून पैसे स्वीकारून कल्याण मटका जुगार चालवत असल्याचे आढळून आले.
यावेळी पोलिसांनी छापा टाकून १८ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. या प्रकरणी संबंधित तिघांविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, पोलीस कर्मचारी प्रकाश कदम तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे महेश जाधव व अनिल धुरी यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.



