फेरतपासणीत मिलाग्रीसचा ‘विराज’ ठरला जिल्ह्याचा सिराज! ; ४ गुणांची भरारी, ९९.८०% गुणांसह सिंधुदुर्गात द्वितीय, मुलांमध्ये अव्वल स्थान!

सावंतवाडी : जिद्द, आत्मविश्वास आणि स्वतःच्या गुणवत्तेवर असलेला अढळ विश्वास याच्या जोरावर सावंतवाडीतील मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळ याने दहावीच्या निकालात अभूतपूर्व यश संपादन केले आहे. उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीनंतर तब्बल ४ गुणांची वाढ झाल्याने त्याने जिल्ह्यातील पाचव्या क्रमांकावरून थेट द्वितीय क्रमांकावर झेप घेतली आहे. ५०० पैकी ४९९ गुण (९९.८०%) मिळवत त्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलांमध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आहे. अवघ्या एका गुणामुळे शंभर टक्के गुणांचा आणि जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा मान हुकला असला, तरी त्याच्या या यशाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

८ मे रोजी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात विराजला ५०० पैकी ४९५ गुण मिळाले होते. त्यावेळी त्याने सावंतवाडी तालुक्यात तिसरा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाचवा क्रमांक मिळवला होता. मात्र स्वतःच्या अभ्यासावर आणि कामगिरीवर पूर्ण विश्वास असल्याने त्याने उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीसाठी अर्ज केला. या फेरतपासणीत संस्कृत विषयात ३ गुण तर भूगोल विषयात १ गुण वाढला, आणि त्याच्या यशाला नवे पंख लाभले.

फेरतपासणीच्या या निर्णयाने विराजचे केवळ गुणच वाढले नाहीत, तर त्याने जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीतही मोठी झेप घेतली. त्याच्या या यशामागे पालक, शिक्षक तसेच मिलाग्रीस हायस्कूलचे प्राचार्य आणि शिक्षकमंडळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विराज राऊळ हा केवळ अभ्यासातच नव्हे तर विविध क्षेत्रांतही उजवा ठरला आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, पुणे यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. तसेच आठवीत विज्ञान प्रदर्शनातील विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून त्याने आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवली होती.

चित्रकलेची विशेष आवड असलेल्या विराजला हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढण्याचे कौशल्य अवगत आहे. संगीताचीही त्याला आवड असून हार्मोनियमच्या तीन परीक्षा त्याने यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत.

मुळचा मळगावचा सुपुत्र असलेला विराज हा ओटवणे हायस्कूलचे शिक्षक नंदकिशोर राऊळ यांचा मुलगा असून शिवसेना माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघ विभागप्रमुख उमेश गावकर यांचा भाचा आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles