- आई कुर्लादेवी व महालक्ष्मी चरणी अमित सामंत यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना!
कणकवली : वाढदिवस म्हणजे केक, फटाके आणि शुभेच्छांचा वर्षाव… मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुक्यात एक वेगळाच आदर्श निर्माण करण्यात आला. नवीनकुर्ली येथे तब्बल २०१ वृक्षांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
विशेष म्हणजे, केवळ वृक्ष लावून औपचारिकता न करता कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी या सर्व २०१ वृक्षांचे पुढील पाच वर्षे संगोपन आणि संवर्धन करण्याचा संकल्प जाहीर करत उपक्रमाला अधिक अर्थपूर्ण स्वरूप दिले. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ वाढदिवसापुरता मर्यादित न राहता भविष्यातील हिरव्या पर्यावरणाची बीजे रोवणारा ठरला.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेत परिसर हिरवागार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
अमित सामंत हे जिल्ह्याच्या राजकारणातील संवेदनशील नेतृत्व असून कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान आहेत, असे मत व्यक्त करत त्यांच्या निरोगी, सुखी आणि दीर्घायुष्यासाठी आई कुर्लादेवी आणि आई महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
या प्रसंगी कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष नयन गावडे, उपतालुकाप्रमुख महेश चव्हाण, विभाग प्रमुख रमेश राणे, शाखाप्रमुख निलेश राणे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारत वाढदिवसाला समाजोपयोगी दिशा देणारा हा उपक्रम परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला असून, “एक वाढदिवस… २०१ झाडांचे आयुष्य!” असा संदेश देत सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे.



