सिंधुदुर्ग : सामाजिक, शैक्षणिक आणि युवक विकासाच्या क्षेत्रात गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या कोकण कला व शिक्षण विकास संस्थेला महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थेच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
१५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आदी मान्यवरांच्या हस्ते संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
ग्रामीण व वंचित घटकांच्या विकासाला प्राधान्य देत संस्थेने गेल्या दीड दशकात विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. शिक्षण, महिला सक्षमीकरण, युवक विकास, ग्रामविकास, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक विकास या क्षेत्रांत संस्थेच्या माध्यमातून सातत्याने उपक्रम राबविण्यात येत आहेत.
विशेषतः विद्यार्थी, महिला, युवक तसेच ग्रामीण भागातील समुदायांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेने विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या घटकांना संधी उपलब्ध करून देणे, महिलांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने प्रोत्साहन देणे आणि युवकांना सकारात्मक दिशा देणे, या उद्देशाने संस्थेची वाटचाल सुरू आहे.
‘स्वातंत्र्य म्हणजे केवळ ध्वजारोहण नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने, आत्मविश्वासाने आणि समान संधीने जगता यावे यासाठी योगदान देणे,’ या विचारातून संस्थेचे सामाजिक कार्य सुरू आहे.
पुरस्कारातून वाढली जबाबदारी
हा पुरस्कार केवळ संस्थेचा सन्मान नसून संस्थेसोबत कार्यरत असलेले कार्यकर्ते, स्वयंसेवक, दाते आणि हितचिंतक यांच्या योगदानाचीही पावती असल्याची भावना संस्थेकडून व्यक्त करण्यात आली. पुरस्कारामुळे संस्थेच्या १५ वर्षांच्या सामाजिक वाटचालीला शासकीय मान्यता मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या सन्मानामुळे भविष्यात अधिक व्यापक आणि परिणामकारक समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा मिळाली असून, शिक्षण, महिला सक्षमीकरण, युवक विकास आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था अधिक जोमाने कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात आले.
सिंधुदुर्गच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या १५ वर्षांच्या वाटचालीवर उमटलेली ही शासकीय मोहोर ठरली असून, आगामी काळातील कार्यासाठी हा पुरस्कार नवी ऊर्जा देणारा ठरणार आहे.



