कुडाळ : विद्यार्थ्यांमध्ये कॅरम व बुद्धिबळ या बौद्धिक खेळांची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना स्पर्धात्मक स्तरासाठी तयार करता यावे, या उद्देशाने मुक्ताई ॲकेडमी, सावंतवाडी यांच्या वतीने रविवार, ५ जुलै रोजी कुडाळ येथे कॅरम व बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर मराठा समाज हॉल, कुडाळ येथे सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत होणार असून पाच वर्षांवरील मुलगे व मुली सहभागी होऊ शकतात. शिबिरात कॅरम व बुद्धिबळाचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात येणार असून, ॲकेडमी, शालेय तसेच असोसिएशनतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांची माहिती, त्यामधील गुणपद्धती, संधी आणि त्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मुक्ताई ॲकेडमी गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी कॅरम व बुद्धिबळ प्रशिक्षण, स्पर्धा आणि विविध उपक्रम राबवत आहे. ॲकेडमीचे अनेक विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शालेय तसेच असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये पारितोषिक विजेते ठरले आहेत. उत्कृष्ट कार्याबद्दल ॲकेडमीला राज्य व राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट ॲकेडमी’ पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी कौस्तुभ पेडणेकर (मो. ८००७३८२७८३) यांच्याशी संपर्क साधावा, तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.



