सावंतवाडी : माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या गंभीर तक्रारीनंतर कथित अघोरी प्रथा, काळी जादू आणि भोंदूगिरीच्या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. या तक्रारीच्या आधारे ठाणे पोलिसांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबई परिसरातील काही कथित भोंदू बाबांविरोधात कारवाई सुरू केली असून, सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील फिरोज बाबाला स्थानिक पोलिसांच्या मदतीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात नगरसेवक गितेश राऊत, माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह अन्य काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे समोर येत आहे. तक्रारीत विवाहितेला कथित काळी जादू, अघोरी विधी तसेच गोमूत्र पिण्यास भाग पाडल्यासारखे अमानुष प्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांमुळे प्रकरणाची राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
तपासादरम्यान भांडुपचे आबा राऊत, कोलगावचे फिरोज बाबा, राजापूरचे काझी बाबा, कुडाळ-नानेली येथील हरिश्चंद्र घाडी तसेच मुंबईतील कुर्ला परिसरातील एका मुस्लिम बाबाचे नावही समोर आल्याची माहिती मिळत आहे. संबंधित सर्वांची चौकशी सुरू असून, काहींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
कोलगाव येथील फिरोज बाबाकडे केवळ सिंधुदुर्ग किंवा कोकणातीलच नव्हे, तर गोवा, कर्नाटकसह विविध भागांतील नागरिक येत असल्याची चर्चा आहे. काही राजकीय नेत्यांचीही या ठिकाणी ये-जा असल्याचे बोलले जात असून, या प्रकरणानंतर अनेक नावे चर्चेत आली आहेत. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
दरम्यान, ठाणे पोलिसांकडून सर्व संबंधितांची कसून चौकशी सुरू असून, तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत सर्व आरोप हे तक्रारीतील दावे असून त्यांची सत्यता तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.



