विठ्ठल नामाच्या गजरात कलसुलकरच्या चिमुकल्यांची भक्तिरसात न्हालेली दिंडी! ; सावंतवाडीच्या विठ्ठल मंदिरात भरली ‘विठ्ठल नामाची शाळा’!”

सावंतवाडी : “सांग विठूराया, कधी येशील खेळाया… चिमुकली दिंडी माझी निघाली भेटाया…” या निरागस स्वरांनी आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड नामगजराने सावंतवाडीतील ऐतिहासिक श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर परिसर सोमवारी अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाला. मंदिरात सुरू असलेल्या विना सप्ताहानिमित्त सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या आनंद शिशुवाटिका येथील चिमुकल्यांनी वारकरी परंपरेचा सुंदर वारसा जपत भावपूर्ण दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला.

टाळ-मृदुंगाच्या निनादात, कपाळी गंध, गळ्यात तुळशीमाळ आणि वारकरी वेश परिधान केलेल्या चिमुकल्यांनी विठ्ठल नामाचा अखंड गजर करत मंदिर परिसर दुमदुमून सोडला. त्यांच्या निरागस भक्तिभावाने उपस्थित भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, तर मंदिर परिसराला पंढरीचीच अनुभूती लाभली.

आनंद शिशुवाटिका ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून, संस्कारांची समृद्ध शिदोरी देणारी उपक्रमशील शाळा असल्याचे या दिंडी सोहळ्यातून पुन्हा अधोरेखित झाले. विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक मूल्यांची रुजवणूक व्हावी, या उद्देशाने दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त हा दिंडी सोहळा उत्साहात साजरा केला जातो.

या मंगल सोहळ्यात सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, शिक्षिका सौ. प्राजक्ता वेंगुर्लेकर, सौ. सुचिता वारंग, सौ. विभा पई, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग तसेच श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर समितीचे पदाधिकारी व स्थानिक सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.

चिमुकल्या वारकऱ्यांच्या निरागस भक्तीने आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजराने श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरातील वातावरण अधिकच मंगल, पावन आणि भक्तिमय बनले. उपस्थित भाविकांनीही या अनोख्या दिंडी सोहळ्याचे भरभरून कौतुक करत चिमुकल्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles