– आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त भक्ती, अध्यात्म आणि सूक्ष्मचित्रकलेचा अनोखा संगम!
वैभववाडी : आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायाच्या भक्तीचा, श्रद्धेचा आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजराचा उत्सव. याच भक्तिमय वातावरणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील गडमठ येथील युवा चित्रकार श्रुती संतोष सुतार हिने आपल्या अनोख्या कल्पकतेतून भक्ती आणि कलेचा अद्वितीय संगम साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पारंपरिक कॅनव्हासला छेद देत तिने वारकरी संप्रदायाच्या भक्तीचे आणि नामस्मरणाचे पवित्र प्रतीक असलेल्या ‘वीणे’वरच भगवान श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांची मोहक प्रतिमा साकारून आपल्या कलेला भक्तीची दिव्य उंची प्राप्त करून दिली आहे.

वारकरी संप्रदायात वीणा हे केवळ एक वाद्य नसून अखंड हरिनाम, श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचे जिवंत प्रतीक मानले जाते. ‘राम कृष्ण हरी’च्या अखंड गजरात वारकरी गळ्यात वीणा धारण करून विठुरायाच्या चरणी लीन होतात. याच पवित्र भावनेतून प्रेरणा घेत श्रुतीने वीणेवर ऍक्रेलिक रंगांच्या सहाय्याने ६.५ इंच उंचीची श्री विठ्ठलांची आणि ५.५ इंच उंचीची माता रुक्मिणीची अत्यंत सूक्ष्म, रेखीव आणि मनमोहक प्रतिमा साकारली आहे. ही कलाकृती केवळ चित्र नसून विठ्ठलभक्तीचा सजीव अनुभव देणारी भक्तिरूपी अर्पण ठरत आहे. या माध्यमातून तिने सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छाही दिल्या आहेत.
सूक्ष्मचित्रकलेच्या (मायक्रो आर्ट) क्षेत्रात श्रुती सुतार हिने यापूर्वीही आपल्या विलक्षण प्रतिभेची अनेकदा प्रचिती दिली आहे. रुईच्या पानावर मारुतीराया, गंधगोळीवर श्री विठ्ठल, तुळशीच्या पानावर आणि मोरपिसावर श्रीकृष्ण, तसेच अत्यंत सूक्ष्म टिकलीवर नऊ दुर्गांची दिव्य चित्रे आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे अप्रतिम सूक्ष्मचित्र तिने साकारले आहे. तिच्या प्रत्येक कलाकृतीत कल्पकतेसोबत सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जाणिवेचा सुंदर संदेश दडलेला असतो.
ग्रामीण भागात राहून आपल्या असामान्य कलागुणांच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गडमठच्या या गुणी कन्येच्या अनोख्या कलाविष्काराचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, तिची ही भक्तिमय कलाकृती आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलभक्तांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



