समर्थ गेला… पण जगण्याचा खरा अर्थ शिकवून गेला! ; पंधरा वर्षे पाच महिने जपलेल्या लेकराने दिली प्रेम, संयम, जिद्द आणि माणुसकीची अमूल्य शिकवण.

सावंतवाडी : काही व्यक्ती आयुष्यभर सोबत राहतात, तर काहींचा सहवास अल्प असतो; पण त्या आपल्या संपूर्ण आयुष्याचा अर्थ बदलून जातात. आमचा लाडका समर्थ हा असाच होता. तो आज देहाने आमच्यात नाही, पण त्याचे निरागस हास्य, त्याची निष्पाप नजर, त्याच्या सहवासातून मिळालेली जगण्याची प्रेरणा आणि संकटांवर मात करण्याची ताकद आमच्या प्रत्येक श्वासात कायमची कोरली गेली आहे.

समर्थ गेला… पण जगण्याचे बळ देऊन गेला!

गेली पस्तीस वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील दिनदुबळे, गरजू, पीडित आणि उपेक्षितांसाठी माझी लेखणी झिजत राहिली. सावंतवाडीपासून सह्याद्रीच्या दुर्गम दऱ्याखोऱ्यांपर्यंत जात, धर्म, पंथ किंवा पक्ष यांचा कधीही विचार न करता अनेकांना मदतीचा हात देण्याचे भाग्य लाभले. पत्रकारिता हा माझ्यासाठी व्यवसाय नव्हता; ती समाजसेवेची अखंड साधना होती.

परंतु नियतीने आमच्यासमोर अशी परीक्षा उभी केली, ज्यासाठी कोणतीही तयारी पुरेशी नव्हती.

माझा द्वितीय पुत्र समर्थ याच्या जन्मानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी छोट्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. त्या दिवसापासून तब्बल पंधरा वर्षे पाच महिने तो अंथरुणावर होता. अनेकांच्या दृष्टीने हे दुःखद आयुष्य होते; पण आमच्यासाठी तो कधीच ओझे नव्हता. तो आमच्या घराचा श्वास होता… आमच्या आयुष्याचा प्रकाश होता… आमच्या प्रत्येक दिवसामागची सकारात्मक ऊर्जा होता.

आम्ही त्याला फुलासारखे जपले. त्याच्या चेहऱ्यावरचे निरागस हास्य कधी मावळू दिले नाही. तो बोलू शकत नव्हता, चालू शकत नव्हता; पण त्याने आम्हाला प्रेम म्हणजे काय, त्याग म्हणजे काय, संयम म्हणजे काय आणि निस्वार्थ सेवा म्हणजे काय, हे आयुष्यभरासाठी शिकवले.

समर्थ आमच्या घरी आला आणि जणू आमचे प्रारब्धच बदलले. घरात सुख, समाधान, समृद्धी आणि सकारात्मकतेचा अखंड झरा वाहू लागला. त्याची सेवा करताना कधीच थकवा जाणवला नाही. त्याची आई सौ. संयुक्ता गावडे यांनी आईपणाची खरी व्याख्या जगासमोर उभी केली. समर्थाची सेवा ही आमच्यासाठी जबाबदारी नव्हती; ती आमची जीवनशैली होती.

आजही मनाला चटका लावणारी एक घटना कायम आठवते.

आमचा मोठा मुलगा कु. साईश गावडे, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओथेरपीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. समर्थाने जणू भावाच्या अंतिम परीक्षेचीच वाट पाहिली. त्याच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून तो शेवटच्या पेपरपर्यंत आमच्यासोबत राहिला आणि परीक्षा पूर्ण होताच बुधवार, १५ जुलै २०२६ रोजी रात्री १० वाजता शांतपणे या जगाचा निरोप घेतला.

तो दिवस दत्तावतार टेंबे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीचा होता. दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ५ मिनिटांनी, श्रीपाद श्रीवल्लभ दत्तगुरूंच्या गुरुवारी, ब्रह्ममुहूर्तावर त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. हा निव्वळ योगायोग होता की समर्थानेच आपल्या अंतिम प्रवासाची वेळ निवडली होती, हा प्रश्न आजही मनात अनुत्तरित आहे.

खरे तर मला दुसरा मुलगा आहे, हे अनेकांना माहीतच नव्हते. त्यामुळे “पुत्रशोक” हे दोन शब्द वाचून असंख्य जण स्तब्ध झाले. त्यानंतर आमच्या घरी जे घडले, ते आयुष्यभर विसरणे शक्य नाही.

सलग दहा दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत सांत्वनासाठी येणाऱ्यांची अक्षरशः रीघ लागली. जवळपास पंधराशेहून अधिक नातेवाईक, मित्र, पत्रकार, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक आणि वाचक आमच्या दुःखात सहभागी झाले. प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते; पण ओठांवर एकच वाक्य होते…

“तुमच्या चेहऱ्यावर इतके मोठे दुःख कधीच दिसले नाही.”

हे खरे आहे. कारण आमच्या चेहऱ्यावरचे हास्य, आमच्या मनातील धैर्य आणि संकटांवर मात करण्याची जिद्द आम्हाला समर्थनेच दिली होती.

आज तो देहाने आमच्यात नाही. पण त्याच्या हातांचे आणि पायांचे आम्ही जपून ठेवलेले ठसे आमच्यासाठी अमूल्य ठेवा आहेत. त्या प्रत्येक ठशात त्याचे अस्तित्व आहे… त्या प्रत्येक ठशात त्याचे प्रेम आहे… आणि त्या प्रत्येक ठशात आम्हाला जगण्याची नवी प्रेरणा आहे.

ते ठसे आम्हाला रोज सांगतील—

“सत्यासाठी लढा…
माणुसकी जपा…
संकटांपुढे कधीही हार मानू नका…
आणि प्रत्येक क्षण प्रेमाने जगा.”

समर्थ आमच्यातून गेला नाही. तो आमच्या आठवणीत, आमच्या श्वासात, आमच्या प्रत्येक चांगल्या कार्यात आणि आमच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात सदैव जिवंत राहील.

या असह्य दुःखाच्या प्रसंगी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या सर्व नातेवाईकांचे, मित्रांचे, पत्रकार बांधवांचे, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचे, माझ्या सर्व वाचकांचे, चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आम्ही मनःपूर्वक ऋणी आहोत.

तुमच्या प्रेमाने, सहवेदनेने आणि दिलासादायक शब्दांनी हे दुःख सहन करण्याचे बळ आम्हाला दिले. हे ऋण आम्ही आयुष्यभर विसरणार नाही.

समर्थ गेला… पण जगण्याचा खरा अर्थ शिकवून गेला!
आमच्या हृदयात त्याचे स्थान सदैव अढळ राहील…

🌹

– सीताराम गावडे (बाबा)
– सौ. संयुक्ता गावडे (आई)
– कु. साईश गावडे (भाऊ)

समस्त गावडे, सावंत व बिरोडकर परिवार
बिरोडकर टेंब, सावंतवाडी

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles