सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै. सूर्यकांत बाळकृष्ण पेडणेकर यांच्या स्मरणार्थ मुक्ताई ॲकेडमीतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी सावंतवाडी शहर मर्यादित भव्य कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खासकीलवाडा येथील पाटणकर वाड्यात असलेल्या मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात पार पडणार आहे.
सावंतवाडी शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना कॅरम या खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील सुप्त कौशल्यांना वाव मिळावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने प्रथमच अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी दिली.
स्पर्धा इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये खेळविण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम चार विजेत्यांना रोख पारितोषिक, चषक, पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल. तसेच प्रत्येक गटातील तीन मुलींना विशेष प्रोत्साहनपर पारितोषिके प्रदान करण्यात येणार असून, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
स्पर्धेसाठी शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी कौस्तुभ पेडणेकर (मो. ८००७३८२७८३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुक्ताई ॲकेडमीच्या सरचिटणीस सौ. स्नेहा पेडणेकर यांनी केले आहे. स्पर्धेसंदर्भातील आयोजकांचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक राहील.



