उल्हासनगर : घरा शेजारी राहणाऱ्या मुलासोबत सुरू असलेल्या प्रेम संबंधाला आईचा विरोध होता. त्यामुळे प्रियकरासोबत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मुलीची आईने ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराशेजारी राहणाऱ्या मुलासोबत सुरू असलेल्या प्रेम संबंधाच्या कारणावरून जन्मदात्या आईने 19 वर्षीय मुलीची हत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपी आईविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आईला अटक देखील केली आहे.
नेमकं काय घडलं?
उल्हासनगर क्रमांक एकच्या परिसरातील भैय्यासाहेब आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या अमृता गरड या 19 वर्षीय तरुणीचे घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेम संबंध होते. हेच प्रेम संबंध आईच्या निदर्शनास आले. याच बरोबर मुलाच्या जातीला देखील आईचा विरोध असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं. त्यामुळे घरात सतत आई अशा गरड आणि अमृता या दोघींमध्ये वाद होत होते. सततच्या होणाऱ्या भांडणाला कंटाळून अमृता घर सोडून प्रेम संबंध असलेल्या तरुणासोबत पळून जाण्याच्या तयारीत होती. त्यामुळे राग अनावर न झालेल्या आईने ओढणीच्या सहाय्याने अमृताची गळा आवळून हत्या केली.
हत्येसाठी आईला घरातील सदस्यांनी मदत?
सदरील घटना घडताना अमृताचे वडील आणि दोन भाऊ घरातच असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. तर घटना घडल्यानंतर अमृताच्या वडिलांनी स्वतः उल्हासनगर पोलीस ठाण्यात हजर होऊन घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या तपासात आईने मुलीची हत्या केल्याच समोर आलं. आणि त्यानुसार पोलिसांनी आईला अटक केली. दरम्यान या हत्येसाठी आईला घरातील सदस्यांनी मदत केली का? याचा देखील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.



