सावंतवाडी : तिसऱ्या महायुद्धाचे सावट, वाढती महागाई, बेरोजगारी, जीवघेणी स्पर्धा आणि सामाजिक अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर समाजाला आध्यात्मिक आधाराची गरज असून प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवर आधारित ‘रामराज्य’ स्थापनेसाठी साधना आणि गुरुचरणांचे आध्यात्मिक अधिष्ठान आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे आनंद मोंडकर यांनी केले.

सनातन संस्थेच्या वतीने २९ जुलै रोजी आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते मार्गदर्शन करत होते. यंदा सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, इंग्रजी, तेलुगू, मल्याळम् आदी भाषांमध्ये देशभरातील ८१ ठिकाणी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
श्री. मोंडकर म्हणाले की, आजच्या अस्थिर परिस्थितीत केवळ भौतिक उपाययोजना पुरेशा नाहीत. समाजाला मनःशांती, संस्कार आणि योग्य दिशा देण्यासाठी आध्यात्मिक साधनेची आवश्यकता आहे. रामराज्य केवळ राजकीय किंवा भौतिक प्रयत्नांतून नव्हे, तर समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीतून साकार होऊ शकते. श्रद्धा आणि साधना प्रत्यक्ष आचरणात उतरली, तरच सुशासन आणि मूल्याधिष्ठित समाजव्यवस्थेची निर्मिती शक्य आहे.
आगामी काळातील संभाव्य आपत्ती आणि जागतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रथमोपचार, अग्निशमन आणि स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
माजी सैनिक सुभेदार प्रमोद नाईक यांनी मार्गदर्शन करताना मानवी जीवनाचे अंतिम ध्येय केवळ पैसा, वाहन, बंगला किंवा भौतिक सुखसुविधा नसून ईश्वरप्राप्ती आणि ईश्वरानंदाची अनुभूती हे असल्याचे सांगितले. गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनाचे श्रद्धेने पालन करून नियमित साधना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
युद्धसदृश वातावरण, महागाई, रोजगारातील अस्थिरता, स्पर्धात्मक जीवनशैली आणि कौटुंबिक तणाव यांमुळे समाजात अस्वस्थता वाढत आहे. अशा परिस्थितीत मनःशांती, आनंद आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना हा प्रभावी मार्ग आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद करताना आद्य शंकराचार्य, चाणक्य-चंद्रगुप्त मौर्य तसेच रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा दाखला देण्यात आला. राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षणासाठी प्रत्येकाने धर्म-अधर्माचे स्वरूप समजून घेणे, आत्मपरीक्षण करणे आणि समाजासमोरील आव्हानांचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
धर्मशिक्षण, संस्कार आणि समाजजागृतीला प्राधान्य देण्याचे आवाहन करताना भारतीय संस्कृती, परंपरा आणि सण-उत्सवांचे जतन ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले. नियमित साधना आणि धर्मशिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्र व धर्म यांच्या संरक्षणासाठी योगदान देण्याचे आवाहनही करण्यात आले.
गुरुपूजनासह विविध उपक्रम –
महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजन तसेच प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कार्यावर आधारित लघुपट दाखविण्यात आला. तसेच त्यांचा संदेश वाचन, धर्मरक्षक व हिंदुनिष्ठ व्यक्तींचा सत्कार, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके आणि ‘रामराज्य स्थापनेचा संकल्प’ करण्यात आला. भावपूर्ण नामजपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
दरम्यान, गुरुपौर्णिमेनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड आणि मल्याळम् भाषांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवाचाही देश-विदेशातील हजारो भाविकांनी लाभ घेतला.



