मुंबई : मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 41 वर्षीय कॉन्स्टेबल गणेश रायते यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गणेश रायते गॅलेक्सी अपार्टनेंटबाहेर तैणात होते अशी माहिती समोर आली आहे. आज सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.
गॅलेक्सी बाहेर गार्ड ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका –
समोर आलेल्या माहितीनुसार, गणेश रायते हे गॅलेक्सी बाहेर गार्ड ड्युटीवर तैनात असताना संध्याकाळी सहा वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना तत्काळ भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. गणेश रायते मुंबई पोलिसांच्या LA 4 मध्ये कार्यरत होते. ते लष्करातून मुंबई पोलिसांमध्ये भरती झाले होते अशीही माहिती समोर आली आहे.



