रांची : आदिवासी खाद्यसंस्कृतीचा सुगंध, पारंपरिक चवींचा आस्वाद आणि आधुनिक पाककलेचा सुरेख संगम घडविणाऱ्या झारखंड कुकरी लीगच्या आठव्या पर्वात सावंतवाडीच्या तनिष चव्हाणने आपल्या पाककलेची चुणूक दाखवत राष्ट्रीय स्तरावर दिमाखदार यश संपादन केले. आयएचएम मुंबईचा विद्यार्थी असलेल्या तनिष महेश चव्हाण याने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत सावंतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला झारखंड येथील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (आयएचएम) येथे झारखंड कुकरी लीगच्या आठव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले. देशाच्या विविध भागांतून आलेल्या ३२ स्पर्धकांनी झारखंडसह विविध जनजातीय समाजांच्या पारंपरिक खाद्यपदार्थांना आपल्या कल्पकतेची आणि पाककौशल्याची जोड देत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने सादर केले.
या स्पर्धेत विविध संस्थांमधून १७ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरीत प्रत्येक स्पर्धकाने आपल्या पाककलेतील कसब पणाला लावत परीक्षकांसमोर पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे आकर्षक सादरीकरण केले. यामध्ये आयएचएम हैदराबादच्या शिरीष सुगतीक यांनी प्रथम क्रमांक पटकावत १० हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले.
तर मूळ सावंतवाडीचा आणि आयएचएम मुंबईचा विद्यार्थी तनिष महेश चव्हाण याने आपल्या उत्कृष्ट पाककृती व प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावत ७ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. सीआयएच हैदराबादच्या एम. सूर्य यांनी तृतीय क्रमांक मिळवत ४ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.
यावेळी आयएचएमचे प्राचार्य डॉ. भूपेश कुमार यांनी स्पर्धेतील उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक केले. पारंपरिक आदिवासी खाद्यसंस्कृतीला पाककलेच्या माध्यमातून राष्ट्रीय व्यासपीठ मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
सावंतवाडी येथील चव्हाण कुटुंबाच्या शिरपेचात मानाचा तुरा –
तनिष चव्हाण हा आजगाव अध्यापक विद्यालयाच्या प्राध्यापिका सौ. प्रतिभा चव्हाण व महेश चव्हाण यांचा सुपुत्र आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय स्तरावरील पाककला स्पर्धेत तनिषने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशामुळे सावंतवाडीच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लहान वयातच पाककलेतील कौशल्याला राष्ट्रीय स्तरावर सिद्ध करत तनिषने सावंतवाडीच्या नावाची चव थेट झारखंडच्या व्यासपीठावर पोहोचवली, अशी भावना व्यक्त होत असून त्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल विविध क्षेत्रांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



