विधानसभा रणांगणातील प्रतिस्पर्धी, तिरंग्याखाली सहकारी!, आ. दीपक केसरकर – विशाल परब उद्या एकाच व्यासपीठावर! ; सावंतवाडीतील तिरंगा रॅली ठरणार राजकीय ‘हायव्होल्टेज’ क्षण!

✍️ रूपेश पाटील.

सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात एकमेकांविरोधात शड्डू ठोकत थेट लढत देणारे सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणारे भाजपा राज्य युवा नेते विशाल परब हे उद्या एका व्यासपीठावर येणार आहेत. निमित्त आहे भव्य तिरंगा रॅलीचे!

विशाल परब यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या भव्य तिरंगा रॅलीकडे सध्या संपूर्ण कोकणाचे लक्ष लागले आहे. हजारो नागरिकांच्या सहभागाने ही रॅली ऐतिहासिक ठरणार असल्याचा दावा विशाल परब यांनी केला आहे. देशाभिमान आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून आयोजित या रॅलीत सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होणार आहेत.

विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांसमोर उभे ठाकलेले केसरकर आणि परब आता तिरंग्याच्या साक्षीने एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे या राजकीय भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आमदार दीपक केसरकर यांनीही देशाभिमानाची भावना जपत उद्याच्या तिरंगा रॅलीत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रॅलीच्या निमित्ताने केसरकर आणि विशाल परब यांची एकाच मंचावरील उपस्थिती हा सावंतवाडीच्या राजकारणातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

उद्या एकाच मंचावर आल्यानंतर दोन्ही नेते नेमके काय बोलणार? राजकीय मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रध्वजासाठी एकत्र येताना कोणता संदेश देणार? भविष्यातील राजकीय समीकरणांना या भेटीची काही किनार मिळणार का? या प्रश्नांमुळे तिरंगा रॅलीबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

तिरंगा रॅली केवळ राष्ट्रभक्तीचा उत्सव ठरणार की सावंतवाडीच्या राजकारणातील नव्या चर्चेला दिशा देणार, याकडे सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकण आणि राज्याचे लक्ष लागले आहे. उद्याची सावंतवाडीची तिरंगा रॅली ठरणार राजकीय चर्चेचा ‘हॉटस्पॉट’

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles