सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांनी सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी सावंतवाडी शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि नागरिकांमध्ये प्रभावी समन्वय कसा निर्माण करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित, सुरळीत व योग्य पोलीस सेवा मिळावी, तसेच उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनी कोणती भूमिका बजावावी, यावरही विचारविनिमय झाला.
सण-उत्सवांच्या काळात गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, सुरक्षितता आणि संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
दरम्यान, नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सावंतवाडीतील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून, यासाठी नागरिकांकडूनही योग्य ते सहकार्य निश्चितच मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या भेटीतून ‘सुरक्षित सावंतवाडीसाठी पोलीस आणि नागरिकांची भागीदारी’ हा सकारात्मक संदेश देण्यात आला.



