कणकवलीत गांजाविक्रीचा पर्दाफाश! ;पोलिसांचा सापळा अन् दोघे जाळ्यात; १.७९८ किलो गांजा, दोन दुचाकींसह १.८० लाखांचा मुद्देमाल जप्त!

कणकवली : कणकवली शहरातील गांगोमंदिर ते चौंडेश्वरी मंदिर मार्गावर गांजाची खरेदी-विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईत १.७९८ किलो गांजा, दोन दुचाकी असा तब्बल १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.

कणकवली शहरातील टेंबवाडी येथील आम्रपाली सोसायटीजवळ काहीजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. त्यानंतर दोन पंच आणि प्रमाणित वजनकाटाधारकाला सोबत घेत पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला.

पोलिसांच्या या सापळ्यात सूर्यकांत राघो घाडीगावकर (वय २९, रा. वागदे, देऊळवाडी, ता. कणकवली) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला त्यांच्या ताब्यातील मोपेड व मोटारसायकलीसह शिताफीने पकडण्यात आले.

झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातील दोन पारदर्शक प्लास्टिक पिशव्यांमध्ये हिरवट रंगाचा आणि उग्र वासाचा गांजा आढळून आला. प्लास्टिक पिशव्यांसह वजन केले असता गांजाचे वजन १.७९८ किलो भरले.

 पोलिसांच्या कारवाईत काय जप्त?

– गांजा – १.७९८ किलो – किंमत ₹६० हजार
– यमाहा फॅसिनो दुचाकी – ₹८० हजार
– हिरो स्प्लेंडर दुचाकी – ₹४० हजार
– एकूण मुद्देमाल – ₹१ लाख ८० हजार

गांजाच्या विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या दुचाकींसह मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त झाल्याने कणकवली परिसरातील अमली पदार्थांच्या व्यवहारावर पोलिसांनी केलेल्या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.

ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉमिनिक डिसोझा, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र गोसावी, विल्सन डिसोझा, आशिष जामदार, जॅक्सन घोन्सालवीस, तसेच पोलीस कॉन्स्टेबल श्री. समजिस्कर व अमर कांडर यांच्या पथकाने केली.

कणकवलीत गांजाच्या व्यवहाराला पोलिसांचा जोरदार दणका बसला असून, या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या तस्करी-विक्रीविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसून आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles