‘ओरिजीन’चा खरा सूत्रधार कोण?, सासोलीपासून पिंगुळी-तिलारीपर्यंत प्रकल्पांवर गंभीर सवाल! ; स्थानिक जमीन, पर्यावरण आणि पाण्याच्या प्रश्नावरून डॉ. जयेंद्र परुळेकर यांचा घणाघाती सवाल!, सर्व ‘ओरिजीन’ प्रकल्पांची चौकशी करून स्थगितीची मागणी.

सिंधुदुर्ग : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधिमंडळात दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथील कथित बेकायदेशीर व्हिला प्रकल्प, स्थानिक ग्रामस्थांची फसवणूक आणि वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ‘ओरिजीन’ व्हिला प्रकल्पाची चर्चा पुन्हा एकदा जिल्ह्यात ऐरणीवर आली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सासोलीसह तिलारी आणि पिंगुळी येथील प्रकल्पांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दिल्ली-गुडगाव येथील ‘एक्झॉन डेव्हलपर्स’ कंपनीचा ‘ओरिजीन’ या नावाने सासोलीबरोबरच दोडामार्ग तालुक्यातील तिलारी-पाट्ये आणि कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथेही प्रकल्प सुरू असल्याचा दावा परुळेकर यांनी केला आहे. त्यामुळे एकाच प्रकल्पाचे विविध ठिकाणी विस्तारलेले स्वरूप नेमके किती मोठे आहे आणि त्यामागील आर्थिक-सामाजिक ‘नेटवर्क’ कोणते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सासोलीतील जमीन आणि वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर –

सासोली येथे सामाईक जमिनीवर कथितरित्या अवैध कब्जा करून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप परुळेकर यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, महसुली क्षेत्रासोबतच लगतच्या वनक्षेत्रातही वृक्षतोड झाल्याचे प्रकरण समोर आले असून, या प्रकरणात प्रकल्प मालकांना २० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

सामाईक जमीनमालकांची संमती किंवा परवानगी नसताना जमीन ताब्यात घेण्याचे आणि मोठमोठे वृक्ष तोडण्याचे धाडस प्रकल्पाशी संबंधितांना कुठून मिळाले, असा थेट सवाल परुळेकर यांनी केला आहे.

‘स्थानिक जमीन दलाल आणि प्रशासनातील संगनमत?’

या प्रकल्पांमागे स्थानिक जमीन दलाल, सत्ताधारी पक्षातील काही पदाधिकारी तसेच महसूल आणि वन प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आर्थिक संगनमत असल्याचा गंभीर आरोपही परुळेकर यांनी केला आहे. मात्र या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे संबंधित प्रशासन आणि कंपनीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

तिलारीतही ‘सेकंड होम इन फॉरेस्ट’चा दावा –

तिलारी बॅकवॉटरलगतच्या पाट्ये गावातही स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता ‘तिलारी प्लॉट फॉर सेल’च्या जाहिराती सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. सुमारे हजार ते दीड हजार एकर क्षेत्राशी संबंधित ‘सेकंड होम इन फॉरेस्ट’ प्रकल्पाच्या जाहिराती गोव्यातील महामार्गालगत मोठ्या होर्डिंग्जच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे परुळेकर यांनी म्हटले आहे.

पिंगुळीत २७५ व्हिलांचा प्रकल्प; पाणी आणि शेकरूच्या अधिवासाचा प्रश्न –

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील ‘ओरिजीन’ प्रकल्पात २७५ व्हिलांचे बांधकाम प्रस्तावित असल्याचा दावा परुळेकर यांनी केला आहे. हा प्रकल्प पिंगुळी येथील जिल्हा परिषद पाझर तलावाच्या परिसरात होत असल्याने पर्यावरण आणि पाणीपुरवठ्याच्या दृष्टीनेही गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या परिसरात महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू (जायंट स्क्विरल) याचा पारंपरिक अधिवास असल्याचा दावा करत, प्रकल्पामुळे वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच पाझर तलावावर पिंगुळीतील शेकडो घरांची नळपाणी योजना अवलंबून असल्याने स्थानिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

‘सर्व प्रकल्पांना स्थगिती देऊन चौकशी करा’ – डॉ. जयेंद्र परुळेकर 

सासोलीपुरता हा प्रश्न मर्यादित न ठेवता ‘ओरिजीन’च्या सर्व प्रकल्पांची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करावी, तोपर्यंत संबंधित बांधकामांना स्थगिती द्यावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.

“हजारो कोटींच्या संभाव्य उलाढालीसमोर स्थानिक प्रशासन हतबल आहे का? ग्रामस्थांच्या हक्कांपेक्षा मोठ्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जात आहे का?” असे सवाल उपस्थित करत, सासोलीतील ग्रामस्थ गेल्या दोन-अडीच वर्षांपासून न्यायासाठी लढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आता ‘ओरिजीन’च्या विविध प्रकल्पांना कोणत्या परवानग्या मिळाल्या, जमीन व्यवहार आणि पर्यावरणीय नियमांचे पालन झाले आहे का, तसेच स्थानिक प्रशासनाची भूमिका काय आहे, याची अधिकृत चौकशी होणार का, याकडे सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles