सावंतवाडी : “स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या यशामागे केवळ अभ्यास नव्हता, तर शालेय जीवनात अभ्यासासोबतच सहशालेय उपक्रम आणि विविध खेळांमध्ये घेतलेला सक्रिय सहभाग होता. खेळामुळे विविध खेळांची, खेळाडूंची आणि स्पर्धांची जाण निर्माण झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत किमान एक तरी खेळ आत्मसात करून त्यात प्रावीण्य मिळवावे; कारण खेळातूनच जिद्द, शिस्त, आत्मविश्वास आणि विजयाची मानसिकता घडते,” असा यशाचा कानमंत्र सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सावंतवाडी येथील मुक्ताई अकॅडमीने आपल्या यशस्वी वाटचालीचे दहावे वर्ष दिमाखात सुरू करताना अकॅडमीच्या खेळाडूंसाठी नव्या जर्सीचे मान्यवरांच्या हस्ते शानदार अनावरण केले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात तहसीलदार श्रीधर पाटील बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते प्रा. रुपेश पाटील, बँक ऑफ इंडिया सावंतवाडी शाखेचे वरिष्ठ प्रबंधक विनायक नार्वेकर, पाटणकरवाड्याचे सुशांत पाटणकर, जनार्दन लक्ष्मण शिर्सेकर शिक्षण संस्था, मुंबईच्या संचालिका अनुपमा शेटगे, पत्रकार साबाजी परब, मुक्ताई अकॅडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, सरचिटणीस सौ. स्नेहा पेडणेकर आणि कोषाध्यक्ष बाळकृष्ण पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अकॅडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.




त्यानंतर अकॅडमीच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. खेळाडूंच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि नव्या जर्सीचा अभिमान यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.


‘खेळ म्हणजे केवळ स्पर्धा नव्हे, तर आयुष्याची शाळा!’ – प्रा. रुपेश पाटील.
प्रा. रुपेश पाटील यांनी मुक्ताई अकॅडमीच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाचा मागोवा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर किमान एक तरी खेळ आत्मसात करा आणि त्यात प्रावीण्य मिळवा,” असे आवाहन त्यांनी केले.


सावंतवाडी शहरात बुद्धिबळ आणि कॅरमसारखे बुद्धीला चालना देणारे खेळ कौस्तुभ पेडणेकर यांच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे रुजविले जात असल्याचे सांगत त्यांनी मुक्ताई अकॅडमीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
‘मुक्ताई’च्या माध्यमातून मुलांना दर्जेदार क्रीडा संस्कार!- विनायक नार्वेकर.

बँक ऑफ इंडिया शाखा सावंतवाडीचे वरिष्ठ प्रबंधक विनायक नार्वेकर यांनी आपण स्वतः क्रीडाप्रेमी असल्याचे सांगत आपल्या पाल्यांना मुक्ताई अकॅडमीच्या माध्यमातून दर्जेदार प्रशिक्षण मिळत असल्याचे नमूद केले.
कौस्तुभ पेडणेकर यांच्या अथक परिश्रमातून विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षणासोबतच संस्कारक्षम वातावरण मिळत असल्याचे सांगत त्यांनी अकॅडमीच्या कार्याचे कौतुक केले.
दहा वर्षांची वाटचाल अन् हजारो स्वप्नांना क्रीडाक्षेत्राची दिशा! – कौस्तुभ पेडणेकर.

प्रास्ताविकात अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी मुक्ताई अकॅडमीच्या दशकभराच्या प्रवासाचा लेखाजोखा मांडला.
गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्यातील शालेय मुलांसाठी कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस यांसह ॲक्टिंग, म्युझिक, डान्स अशा विविध उपक्रमांमधून अकॅडमी कार्यरत आहे. विद्यार्थ्यांसाठी सेमिनार, कोचिंग आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.
आजवर एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अकॅडमीत प्रशिक्षण घेतले असून, बुद्धिबळातील ३० विद्यार्थी आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बनले आहेत. अवघ्या पाच वर्षांच्या वयापासून मुले अकॅडमीत प्रशिक्षण घेत असून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होत पारितोषिकांची लयलूट करत आहेत.
कॅरममध्येही अकॅडमीच्या १६ खेळाडूंनी राज्यस्तरावर, तर तीन मुलींनी राष्ट्रीय स्तरावर पारितोषिके मिळवून सावंतवाडीच्या क्रीडा क्षेत्राचा लौकिक उंचावला आहे.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा विशेष गौरव!
कार्यक्रमात तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय बुद्धिबळपटू आणि जिल्ह्यातील अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


तसेच कॅरममध्ये सलग चार वेळा राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या आणि राज्य उपविजेत्या कॅरमपटू, तसेच बुद्धिबळ स्पर्धेत सलग चार वेळा विभागस्तरावर निवड झालेल्या साक्षी रामदूरकर हिचाही श्रीधर पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौस्तुभ पेडणेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्नेहा पेडणेकर यांनी मानले.
मुक्ताई अकॅडमीच्या दशकपूर्तीच्या या सोहळ्याने केवळ नव्या जर्सीचे अनावरण केले नाही, तर सावंतवाडीच्या क्रीडा विश्वात नव्या पिढीच्या स्वप्नांना, जिद्दीला आणि कर्तृत्वाला नवी झेप देण्याचा संकल्पही अधोरेखित केला.



