दोडामार्ग : चिमुकल्या ओठांवर उमटलेले कवितेचे सूर, शब्दांमधून साकारलेले भावविश्व आणि निरागस सादरीकरणातून खुललेली काव्याची मैफल… अशा उत्साहपूर्ण वातावरणात नूतन विद्यालय कळणे येथे बालकाव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कै. दत्ताराम कृष्णा देसाई व कै. जानकी दत्ताराम देसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कवींच्या कविता प्रभावीपणे सादर करत उपस्थित रसिकांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण काव्यमैफल चांगलीच रंगली. मालवणी कवी दादा मडकईकर यांच्यासह कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आदी लोकप्रिय कवींच्या कविता उर्वी देसाई, शमिका देसाई, अंश्रीता जाधव, प्रतीक्षा जाधव, श्रुती कळणेकर, प्रसाद देसाई, रुची देसाई, अनिश देसाई, तन्मय झोरे या विद्यार्थ्यांनी सादर करून काव्यरसिकांना मंत्रमुग्ध केले.

काव्यवाचन स्पर्धेतील विजेते –
लहान गटात ‘हुंबरून वासराले चाटते जवा गाय’ ही कविता सादर करून ओम भीमराव देसाई याने प्रथम क्रमांक पटकावला. ‘राजे एकदा येऊन बघा’ या कवितेसाठी निधी राजन गावकर हिने द्वितीय, तर ‘जावईबापू’ या कवितेसाठी योगिता आप्पाजी गवस हिने तृतीय क्रमांक मिळवला.
मोठ्या गटात ‘गाणं घराच्या राजाचं’ या कवितेच्या प्रभावी सादरीकरणासाठी आर्या आप्पाजी गवस हिने प्रथम क्रमांक मिळवला. पु. ल. देशपांडे यांची ‘कॉलेजचे गेट’ ही कविता सादर करून अर्जुन अनिल परब याने द्वितीय, तर दक्षता किशोर नाईक हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या सर्व विजेत्यांना प्रशालेच्या लिपिक राजेश्री देसाई यांनी पारितोषिके देऊन गौरविले.
रंगांच्या दुनियेतही विद्यार्थ्यांची भरारी!
यावेळी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत लहान गटात हर्षली विष्णू नार्वेकर हिने प्रथम, परी प्रितेश देसाई हिने द्वितीय, तर योगिता आप्पाजी गवस हिने तृतीय क्रमांक मिळवला. मोठ्या गटात आर्या आप्पाजी गवस प्रथम, शमिका मिलिंद देसाई द्वितीय, तर उर्वी संदेश देसाई हिने तृतीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा निकिता सावंत यांनी प्रायोजित केली.
रांगोळी स्पर्धेत लहान गटात हर्षली विष्णू नार्वेकर प्रथम, ओम भीमराव देसाई द्वितीय, तर रुची गुरुदास देसाई तृतीय आली. मोठ्या गटात श्रुती चंद्रशेखर कळणेकर हिने प्रथम, मयुरी रामचंद्र गावकर हिने द्वितीय, तर परी प्रितेश देसाई हिने तृतीय क्रमांक मिळवला. ही स्पर्धा उमेश देसाई यांनी पुरस्कृत केली.
‘मिळालेल्या संधीचे विद्यार्थ्यांनी सोने करावे!’ – माजी प्राचार्य पी. यू. देसाई
यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी प्राचार्य पी. यू. देसाई यांनी विद्यार्थ्यांनी अशा संधींचा पुरेपूर फायदा घेत व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे आवाहन केले. आधुनिक युगातील स्पर्धा लक्षात घेता विद्यार्थ्यांनी उपलब्ध प्रत्येक संधीचे सोने करून आपल्या कलागुणांना योग्य दिशा द्यावी, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानावरून संपदा देसाई यांनी विद्यार्थ्यांच्या काव्यवाचनाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सर्व कविता अप्रतिम निवडीचे प्रतीक असल्याचे सांगत, लहान मुलांचे इतके दर्जेदार आणि आत्मविश्वासपूर्ण कविता वाचन आपण यापूर्वी कधी पाहिले नाही, अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाला माजी जि. प. सदस्या तथा उद्योजिका संपदा देसाई, बांदा खेमराजचे माजी प्राचार्य पी. यू. देसाई, शिक्षिका प्रियांका देसाई, मुख्याध्यापक महेंद्र देसाई, ज्येष्ठ शिक्षक प्रशांत राऊळ, कार्यक्रमाच्या प्रायोजक तथा लिपिक राजेश्री देसाई, कार्यक्रम संयोजक सतीश धर्णे, निकिता सावंत, भरत दळवी, अच्युत गावडे, संजय तायवाडे, मधुकर गावकर, संदीप दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक महेंद्र देसाई यांनी केले. सूत्रसंचालन निकिता सावंत यांनी केले, तर आभार सांस्कृतिक विभागप्रमुख सतीश धर्णे यांनी मानले.
चिमुकल्या प्रतिभांना व्यासपीठ, शब्दांना पंख आणि कल्पनांना आकाश देणारी ही बालकाव्यमैफल कळणेच्या नूतन विद्यालयात संस्मरणीय ठरली.



