सावंतवाडीत रानभाज्यांचा दरवळ अन् गावठी वस्तूंची रेलचेल! ; महिला व बालकल्याण समितीच्या पुढाकारातून दोन दिवसीय महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

सावंतवाडी : पावसाळ्यात हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत आपसूक उगवणाऱ्या रानभाज्यांचा सुगंध आणि कोकणच्या मातीत रुजलेल्या गावठी वस्तूंची समृद्ध परंपरा सावंतवाडीत पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात महिला व बालकल्याण समितीच्या पुढाकाराने आयोजित दोन दिवसीय रानभाज्या व गावठी वस्तू महोत्सवाचा शुभारंभ नगराध्यक्ष सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत विविध रानभाज्या व स्थानिक उत्पादनांची खरेदी केली.

या महोत्सवाचे आयोजन महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. दि. २५ व २६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचा मुख्य उद्देश पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्यांची ओळख नव्या पिढीला करून देणे, त्यांच्या पौष्टिक व औषधी गुणधर्मांबाबत जनजागृती करणे तसेच स्थानिक महिला व विक्रेत्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आहे.

महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांनी विविध स्टॉलना भेट देत विक्रेत्यांशी संवाद साधला. रानभाज्यांची माहिती जाणून घेत त्यांनी स्वतः गावठी भाज्यांची खरेदी करून या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

परंपरेची चव आणि आरोग्याचा ठेवा!

पावसाळ्याच्या दिवसांत डोंगराळ व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांना कोकणच्या पारंपरिक आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे मात्र या नैसर्गिक खाद्यपदार्थांची ओळख नव्या पिढीपासून काहीशी दूर होत आहे. हीच पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्यासोबतच रानभाज्यांचे पौष्टिक व औषधी महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्यांसह स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या गावठी वस्तूंचे आकर्षक स्टॉल उभारण्यात आले आहेत. ग्रामीण महिलांच्या हातगुणांना आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळत असल्याने या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

“कोकणच्या मातीत उगवणारी रानभाजी म्हणजे केवळ भाजी नव्हे, तर आपल्या पारंपरिक आहारसंस्कृतीचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा अनमोल ठेवा आहे,” अशी भावना या उपक्रमातून अधोरेखित होत आहे.

नागरिकांनी या महोत्सवाला आवर्जून भेट देऊन रानभाज्या तसेच स्थानिक गावठी उत्पादनांची खरेदी करावी आणि ग्रामीण महिला व स्थानिक विक्रेत्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर तसेच सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.

या महोत्सवामुळे ग्रामीण महिलांना हक्काची बाजारपेठ, स्थानिक विक्रेत्यांना व्यवसायाची संधी आणि नागरिकांना पारंपरिक, पौष्टिक व नैसर्गिक खाद्यपदार्थांची ओळख, असा तिहेरी लाभ मिळत आहे.

यावेळी महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, उपसभापती सुनीता पेडणेकर, नगरसेविका दुलारी रांगणेकर, नीलम नाईक, सुकन्या टोपले, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles