सावंतवाडी : अध्यापनासोबतच प्रयोगशाळेतील उपकरणांचे तांत्रिक ज्ञान, कार्यप्रणाली आणि दुरुस्तीचे कौशल्य आत्मसात करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेला पाच दिवसीय अध्यापक विकास क्षमता कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यशाळेत तब्बल ११० प्रयोगशाळा उपकरणांची दुरुस्ती करण्यात आल्याने जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांना मोठा तांत्रिक लाभ मिळाला.
या कार्यशाळेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, कार्यशाळा समन्वयक डॉ. डी. बी. शिंदे, डॉ. यू. सी. पाटील, डॉ. वाय. ए. चौधरी, डॉ. व्ही. टी. अपराध, डॉ. एस. एम. बुवा तसेच वेस्टर्न रिजनल इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर, मुंबईचे तज्ज्ञ अधिकारी सुधीर कुमार, मीनल ताम्हणकर, सरिता थोपटे, गोविंद चिट्टे, मिलिंद शिद्रुक यांचे मार्गदर्शन लाभले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर, संशोधन विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यशाळेत सहभागी झाले.
समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी सांगितले की, या पाच दिवसीय कार्यशाळेमुळे महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध प्रयोगशाळा उपकरणांची कार्यप्रणाली समजून घेण्यासोबतच त्यांची दुरुस्ती करण्याचे व्यावहारिक ज्ञान मिळाले. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतून आलेल्या सहभागींच्या उपकरणांची तांत्रिक तपासणी व दुरुस्ती करून दिल्याबद्दल त्यांनी वेस्टर्न रिजनल इन्स्ट्रुमेंटेशन सेंटरच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे आभार मानले.
कार्यशाळेचे समन्वयक डॉ. डी. बी. शिंदे यांनी पाच दिवसांच्या प्रशिक्षणाचा आढावा घेताना, एकूण ११० उपकरणांची दुरुस्ती करण्यात आली असून या माध्यमातून सहभागी महाविद्यालयांना मोठा फायदा झाला, असे सांगितले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे सहभागी शिक्षक व कर्मचाऱ्यांना उपकरणांच्या तांत्रिक बाबींचे उत्तम प्रशिक्षण मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
सहभागी प्राध्यापक डॉ. केशव पाखरे (रावराणे कॉलेज, वैभववाडी) यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कार्यशाळेमुळे विविध प्रयोगशाळा उपकरणे, त्यांची कार्यप्रणाली आणि त्यातील पार्ट्स यांची सखोल माहिती मिळाली. त्यामुळे भविष्यात उपकरणे स्वतः हाताळण्यासोबतच किरकोळ दुरुस्ती करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
यावेळी तांत्रिक अधिकारी मीनल ताम्हणकर यांनी महाविद्यालयाने पाच दिवसांच्या कार्यशाळेदरम्यान केलेल्या उत्तम नियोजनाचे कौतुक केले. प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे प्रशिक्षण देणे अधिक सुलभ झाल्याचे त्यांनी सांगितले.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या ॲड. शामराव सावंत यांच्या हस्ते कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. यू. सी. पाटील यांनी केले.
प्रयोगशाळेतील उपकरणांचे तांत्रिक ज्ञान, प्रत्यक्ष दुरुस्तीचे प्रशिक्षण आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास, या त्रिसूत्रीमुळे पंचम खेमराज महाविद्यालयातील ही कार्यशाळा अध्यापक विकासाच्या दृष्टीने निश्चितच मैलाचा दगड ठरली.



