सावंतवाडी : ‘गोविंदा रे गोपाळा…’च्या गजराने दुमदुमलेले वातावरण, डोक्यावर मोरपिसांचा मुकुट, अंगावर पारंपरिक वेशभूषा आणि चेहऱ्यावर निरागस हास्य… अशा भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजीतील चिमुकले विद्यार्थी बाळकृष्ण आणि राधेच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. कृष्णाच्या वेशातील चिमुकल्या गोपाळांचे रूप आणि राधेच्या वेशातील बालिकांचा निरागस साज यामुळे प्रशालेचा परिसर जणू गोकुळनगरीतच परिवर्तित झाल्याचे मनोहारी चित्र पाहायला मिळाले.

मंडळाच्या विश्वस्त तथा विद्यमान नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे लखमसावंत भोंसले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशालेच्या आवारात आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेली दहीहंडी फोडून चिमुकल्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दहीहंडी फोडण्याचा क्षण विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षणाचा ठरला. टाळ्यांचा कडकडाट, जल्लोष आणि उत्साहाने संपूर्ण प्रशाला परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.
या उत्सवात पालकवर्गानेही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या चिमुकल्यांचा उत्साह द्विगुणित केला. पारंपरिक वेशभूषा, रंगीबेरंगी सजावट, बालगोपालांचा निरागस उत्साह आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये दिवसभर उत्सवाचे प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीम. सिंड्रेला परेरा, श्रीम. सेलिन बर्नार्ड, श्रीम. अनघा आयरे आणि श्रीम. सिद्रा शेख या शिक्षिकांनी विशेष मेहनत घेतली. तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
या आनंदोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, संस्थेच्या चेअरमन राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, संचालक श्री. दिलीप देसाई, सहसंचालक ॲड. शामराव सावंत, संस्थेचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत यांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. अनुजा साळगांवकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक-शिक्षक संघ कार्यकारी समितीच्या सदस्यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
चिमुकल्या बालकांच्या निरागस हास्यात, कृष्ण-राधेच्या मोहक वेशभूषेत आणि ‘गोविंदा’च्या जल्लोषात साकारलेला हा दहीहंडी उत्सव विद्यार्थ्यांच्या बालपणीच्या आठवणींमध्ये कायमचा दरवळणारा आनंदाचा क्षण ठरला.




