दोडामार्ग : शिक्षणाच्या वाटेवर अथक परिश्रम, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर यशाचे शिखर गाठणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना पुढील यशासाठी प्रेरणादायी बळ देण्याचा स्तुत्य उपक्रम समाजसेवा हायस्कूल, कोलझर, ता. दोडामार्ग येथे पार पडला. S.S.C. मार्च २०२६ बोर्ड परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संजय शांताराम देसाई यांनी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांच्या यशाला समाजाचा पाठिंबा मिळाल्यास त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळते, याची प्रचिती या उपक्रमातून आली.
गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले समाधानाचे हास्य!
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराबरोबरच प्रशालेतील हातावर पोट असलेल्या व आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. शिक्षणाच्या प्रवाहात आर्थिक अडचणी अडसर ठरू नयेत, या सामाजिक जाणिवेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कोलझर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. व सौ. सुजल सूर्याजी गवस यांनी शालेय गणवेशासाठी ५ हजार रुपयांची रोख देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
शिष्यवृत्ती व NMMS यशस्वी विद्यार्थ्यांचाही गौरव!
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या कुमारी खुशी प्रमोद मळीक हिचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच NMMS परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कुमारी सिद्धाली नेताजी देसाई व कुमारी तन्वी भास्कर परब यांचाही पुष्पगुच्छ व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पताका अधिक उंचावली आहे.
मान्यवरांची उपस्थिती, विद्यार्थ्यांना प्रेरणेची शिदोरी!
या सन्मान सोहळ्यास धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संस्थेच्या समन्वय समितीचे सहसचिव नंदकुमार नाईक, समन्वय समिती सदस्य सुभाष बोंद्रे, शालेय समिती सदस्य, रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष प्रवीण परब, माजी अध्यक्ष भागवत, सुहास सातोसकर, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय देसाई, प्रशालेचे निवृत्त शिक्षक आनंद तारी, समाजसेवा मंडळ कोलझरचे सचिव साबाजी सावंत, मुख्याध्यापक सुनील राठोड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पांगुळ यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान, गरजूंच्या शिक्षणाला मदतीचा हात आणि यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा सोहळा समाजसेवा हायस्कूलच्या शैक्षणिक व सामाजिक वाटचालीतील प्रेरणादायी पर्व ठरला.



