…अन्यथा जनआंदोलन उभारू! ; ॲड. सायली दुभाषी यांचा वनविभागाला इशारा. ; सावंतवाडी झिरंगवाडी परिसरात बिबट्याची दहशत, तारेचे कुंपण उभारण्याची मागणी.

सावंतवाडी : शहरातील झिरंगवाडी परिसरात गवारेड्यांच्या पाठोपाठ आता बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. अलीकडेच या बिबट्याने परिसरातील दोन पाळीव कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना शिकार बनवले. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या धोक्याची दखल घेत बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि वन हद्दीला लागून तारेचे कुंपण उभारावे, या मागणीसाठी नगरसेविका ॲड. सायली दुभाषी यांनी उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिले.
​झिरंगवाडी हा परिसर नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी लागून आहे. त्यामुळे या भागात वन्यजीवांचा मोठा वावर असतो. गेल्या काही वर्षांपासून हे वन्यप्राणी थेट झिरंगवाडीतील मानवी वस्तीत शिरत आहेत. पूर्वी या भागात गवारेड्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर दिसून येत होता; मात्र आता बिबट्याने वस्तीत प्रवेश केल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. हा बिबट्या रात्रीच्या वेळी तसेच भरदिवसाही भक्ष्याच्या शोधात वस्तीत घुसत आहे.
​वन विभागाने नरेंद्र डोंगराच्या काही भागांत वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी तारेचे कुंपण उभारले आहे. त्याच धर्तीवर झिरंगवाडी परिसरातील वन हद्दीवरही कुंपण घालावे, अशी मागणी ॲड. सायली दुभाषी यांनी केली. “वाढत्या वन्यजीवांच्या वावरामुळे उद्या जर एखादी जीवितहानी झाली, तर त्याला जबाबदार कोण?” असा थेट सवाल उपस्थित करत, बिबट्या व गवारेड्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त न झाल्यास नागरिकांसह वनविभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.
​उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत, झिरंगवाडी परिसरात वनरक्षक व वनपालांची दिवस-रात्र गस्त वाढवली जाईल आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले.
​यावेळी ॲड. सायली दुभाषी यांच्यासोबत झिरंगवाडीतील रुकसाना खान, सादिया खान, मेहक खान, फिरदोज खान आणि आरजु खान यांच्यासह स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles