वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विळख्याविरोधात पोलिसांनी आता थेट ॲक्शन मोड स्वीकारला असून, वेंगुर्ला तालुक्यातील एका सत्ताधारी पक्षाच्या राजकीय पदाधिकाऱ्याच्या घरात अमली पदार्थ आढळल्याची घटना समोर आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळासह सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे ‘राजकीय छत्रछायेखाली अवैध धंदे सुरू आहेत का?’ या चर्चेलाही उधाण आले आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी ‘नशामुक्त सिंधुदुर्ग’ हे अभियान हाती घेतले आहे. जिल्ह्यातील अमली पदार्थांची विक्री, साठवणूक आणि इतर अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनीही कारवाईची धुरा अधिक आक्रमकपणे हाती घेतल्याचे चित्र आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील संबंधित प्रकरणात राजकीय पदाधिकाऱ्याच्या घरातच अमली पदार्थ आढळल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. घरात अमली पदार्थ नेमके कसे आले? त्यामागे कोणाचा सहभाग आहे? या प्रकरणाची व्याप्ती किती आहे? याबाबत आता पोलीस तपासातून नेमके काय समोर येते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः ‘ऑन फील्ड’ उतरून अवैध धंद्यांविरोधात कारवाया करत असल्याने अमली पदार्थ विक्रेते, साठेबाज आणि संबंधितांच्या गोटात मोठी धडकी भरली आहे. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून, आगामी काळात कारवाईचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे.
राजकीय पदाधिकाऱ्याच्या घरापर्यंत पोहोचले पोलिसांचे हात!
अमली पदार्थांविरोधातील कारवाई केवळ रस्त्यांवरील संशयितांपुरती मर्यादित न राहता थेट एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या घरापर्यंत पोहोचल्याने ‘कुणाचीही गय केली जाणार नाही’ असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे आणखी कोणती नावे समोर येतात आणि तपासाची दिशा कोणत्या वळणावर जाते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘नशामुक्त सिंधुदुर्ग’च्या घोषणेनंतर पोलिसांच्या कारवाईला आलेली ही धार आगामी काळात आणखी तीव्र होणार का? याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
https://youtube.com/shorts/CKpa50YS25c
ADVT –




